रुग्णालयांकडून ऑक्सिजनचा अनावश्यक वापर! सुरज मांढरेंचे गंभीर निरीक्षण 

कालपर्यंत रुग्णालयांना ऑक्सिजन वापराविषयी विचारणा किंवा तपासणी होत नव्हती, मात्र आता याविषयाकडे गांभीर्याने पाहिले जाणार आहे, असे नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले. 

97

सध्या नाशिक जिल्ह्यामधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे, त्यावर आम्ही बैठक घेतली. तेव्हा शासनाच्या मापदंडाने ज्या रुग्णालयाला ११० लिटर ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून दिला, प्रत्यक्षात मात्र तिथे दुप्पट, तिप्पट प्रमाणात वापर होत असल्याचे धक्कादायक निरीक्षण नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नोंदवले.

नाशिकचा ऑक्सिजनचा तुटवडा दूर होईल!

रुग्णालयांकडून ऑक्सिजनचा अनावश्यक वापर होत असल्याचे दिसून येते म्हणून रुग्णालयांनीच आता त्यांच्याकडील ऑक्सिजनच्या पुरवठा व्यवस्थेचे निरीक्षण करावे, त्यांच्याकडून अनावश्यक ऑक्सिजनचा वापर होत आहे का किंवा लिकेज होत आहे का, हे तपासून घ्यावे, असेही  जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले. नाशिक प्रशासनाने आजच्या दिवसापुरता ऑक्सिजनचा तुटवडा दूर होईल अशी व्यवस्था केली आहे, तसेच सरकारकडूनही ऑक्सिजनचा टँकर येत आहे, तो वाटेत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढली जाईल, असेही मांढरे म्हणाले.

(हेही वाचा : साथीच्या आजारानंतर माणसांची जागा घेणार ‘यंत्रमानव’? काय होऊ शकतो रोजगारावर परिणाम?)

यापुढे रुग्णालयांना जाब विचारणा!

प्रशासन ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्याचा प्रयत्न करत असले तरीही पुन्हा एकदा हा विषय रुग्णालयांकडेच येतो, त्यांच्याकडून आवश्यकता असलेल्या प्रमाणापेक्षा दुप्पट, तिप्पट ऑक्सिजनचा वापर का होत आहे, हे आता तपासण्याची वेळ आली आहे. कालपर्यंत रुग्णालयांना याविषयी विचारणा किंवा तपासणी होत नव्हती, मात्र आता याविषयाकडे गांभीर्याने पाहिले जाणार आहे. तेव्हा रुग्णालयांनी याचे निरीक्षण करून त्यांच्याकडून ऑक्सिजनचा अनावश्यक वापर होत आहे का, गरज नसताना ऑक्सिजन चालू ठेवला जात आहे का, अथवा ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजन पुरवला जात आहे का, या सर्व बाबींचा विचार झाला पाहिजे, असेही जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.