लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेल्या हॉटेल व्यवसायामुळे हॉटेलचे भाडे देखील देता येत नाही, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढलेली असताना विरारमध्ये हॉटेलचे भाडे भरू न शकल्यामुळे एका हॉटेल व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या आत्महत्येचे तीव्र पडसाद हॉटेल व्यावसायिकांमध्ये उमटत आहेत. करुणाकर पुत्रण (४८) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. विरार येथे प्रसिद्ध हॉटेल स्टार प्लँनेट या हॉटेलचे ते चालक होते.
मागील दोन वर्षांपासून हॉटेलचे भाडे तसेच वीज बील थकवले!
हॉटेलच्या मालकाने भाडेवसुलीसाठी त्याच्या मागे तगादा लावल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे करुणाकर याने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. विरार पश्चिमेला जयेंद्र आणि किशोर पाटील यांच्या मालकीचे स्टार प्लॅनेट हे हॉटेल आहे. हे हॉटेल करुणाकर पुत्रण (४८) यांना चालविण्यासाठी दिले होते. मात्र करुणाकर यांनी मागील दोन वर्षांपासून हॉटेलचे भाडे तसेच वीज बील थकवले होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीमुळे हॉटेल व्यवसाय ठप्प झाला होता. त्यातच वेळेची मर्यादा असल्याने धंदा होत नव्हता. परिणामी करुणाकरन यांच्यावर कर्ज वाढत गेले होते. थकलेले भाडे द्यावे या मागणीसाठी हॉटेलमालकांनी तगादा लावला होता. एकीकडे धंदा होत नव्हता आणि दुसरीकडे मालक भाड्यासाठी तगादा लावत होता. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडल्याने करुणाकर निराश झाले होते. याच नैराश्याच्या भरात गुरूवारी सकाळी ९ वाजता हॉटेलमध्ये कुणी नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी करुणाकर यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. कर्जासाठी मालक तगादा लावत असल्याने नैराश्यापोटी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. अर्नाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येचे तीव्र पडसाद हॉटेल व्यावसायिकांमध्ये उमटले आहेत. आता तरी हॉटेल उघडण्यास परवानगी द्या, अशी मागणी हॉटेल संघटनेने केली आहे.
Join Our WhatsApp Community