केरळच्या खाड्यांमधील हाऊसबोटी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात

142
केरळच्या खाड्यांमधील हाऊसबोटी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात
केरळच्या खाड्यांमधील हाऊसबोटी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात

पर्यटन वाढीसाठी केरळच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांमध्ये हाऊसबोट प्रकल्प राबविला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार होणार आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून काही बचतगट एकत्र आणून हाऊसबोटिंगच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीला चालना देण्याचा हा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने लवकरच एक पथक केरळचा दौरा करणार आहे.

जलपर्यटन हा सर्वांच्या आकर्षणाचा विषय आहे. पर्यटकांना समुद्राच्या निळ्याशार पाण्याचे आणि समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन प्रवास करण्याचे आकर्षण आहे. म्हणूनच मुंबई, रायगडमध्ये, दाभोळ येथील फेरीबोटीला चांगला प्रतिसाद मिळतो. मोठमोठ्या आलिशान क्रूझ सुरू होणार आहेत. त्यातून मुंबई-गोवा जलप्रवास करता येणार आहे. कर्ला (ता. रत्नागिरी) येथे खाडीच्या पाण्यामध्ये बोटिंग सुरू आहे. दोन किंवा चार कुटुंबे एकत्र येऊन विरंगुळा म्हणून पाण्यातील सफरीचा आनंद लुटतात. त्यासाठी कॅटररची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

(हेही वाचा – संरक्षण राज्यमंत्र्यांनी सीमा रस्ते संघटना कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात तांत्रिक संकुल आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग ट्रॅकचे केले उद्घाटन)

दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी हाऊसबोटिंगचा आनंद लुटला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक खाड्या आहेत. या खाड्यांमध्ये केरळच्या धर्तीवर हाऊसबोटिंग सुरू करता येऊ शकते, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी यावर विचार केला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कोट्यवधीचा निधी येतो. काही महिला बचतगट एकत्र आणून सुमारे ५० लाख ते ७५ लाखाची एखादी हाऊसबोट बांधून जलपर्यटनाला नवी उंची, दर्जा देण्याचा विचार केला आहे.

याबाबत संबंधित यंत्रणांशी चर्चा करून त्याला कसे अर्थसाह्य मिळेल, याबाबत चर्चा झाली आहे. त्याअनुषंगाने १२ जणांचे एक पथक तयार करून केरळ दौरा केला जणार आहे. या दौऱ्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील हाऊसबोटिंग प्रकल्पाला दिशा मिळणार आहे. केरळ राज्यात खड्यांमधील हाऊसबोट प्रकल्पाद्वारे पर्यटन व्यवसाय अधिक विस्तारला आहे. तशीच स्थिती येत्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण होऊ शकते. केरळकडे आकर्षित होणारे पर्यटक रत्नागिरी जिल्ह्याकडे आकर्षित होऊ शकतील आणि केरळच्या पर्यटन व्यवसायाशी रत्नागिरी जिल्हाही या माध्यमातून निकोप स्पर्धा करू शकेल, अशी अपेक्षा पुजार यांनी व्यक्त केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.