कोरोनाच्या प्रादुर्भावातून देश आता सावरत असताना, वार्षिक मूल्यदरात (रेडीरेकनर) सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्यात सलग दुसऱ्या वर्षी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात वाढ करत यंदा तब्बल ८.१५ टक्के एवढी सर्वाधिक वाढ झाली आहे. ही दरवाढ शुक्रवारपासून (१ एप्रिल) लागू होणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न महागणार आहे.
पुण्यात सर्वाधिक वाढ
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने आजपासून (१ एप्रिल) दरवाढ लागू झाली आहे. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत नवीन दर जाहीर केले. राज्यातील शहरासह जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक ८.१५ टक्के दरवाढ पुणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. पुणे महापालिकेची मूळ हद्द आणि समाविष्ट २३ गावांतील क्षेत्र वेगवेगळे दर्शविण्यात आले आहे. त्यानुसार मूळ हद्द म्हणजेच (नव्याने समाविष्ट झालेली २३ गावे वगळून) ६.१२ टक्के, महापालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावांतील क्षेत्रात १०.१५ टक्के, तर उर्वरित ग्रामीण भागात ११.३ टक्के वाढ झाली आहे.
( हेही वाचा :अशी असणार यंदाची डोंबिवलीतील नववर्ष शोभायात्रा )
इतर शहरांत किती वाढ?
दुसऱ्या स्थानावर औरंगाबाद महापालिका आहे. या महापालिकेत १२.३८ टक्के वाढ झाली असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२.३६ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर नाशिक महापालिका असून, या महापालिकेत १२.१५ टक्के दरवाढ झाली आहे. पाचव्या स्थानावर लातूर महापालिका असून, ११.९३ टक्के वाढ करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र दर असून, या परिसरासाठीही सरासरी २.३४ टक्के वाढ करण्यात आली आहे. मुंबई शहर ०.८४ टक्के आणि मुंबई उपनगरात ३.८३ टक्के वाढ केली आहे.