भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात पावसाचे पाणी शिरलेच कसे? भाजपकडून विचारणा

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांच्याकडे निवेदनाद्वारे भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात पावसाचे पाणी शिरल्याच्या प्रकरणाची चौकशीची मागणी केली.

199

भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेल्या पाण्याची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. पंपिंग स्टेशन हे ५० वर्षांपासून अस्तित्वात असून भूतकाळात कधीही असा प्रकार घडला नाही. संकुलात येणारे पाणी विहार तलावात नैसर्गिकरित्या जाते, ते का गेले नाही, असा सवाल करत भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी याच्या चौकशीची मागणी केली.

काय घडले जलशुद्धीकरण केंद्रात?

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवल्याने येथील विद्युत पुरवठाही खंडित करावा लागला. परिणामी मुंबईचा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पूर्व उपनगरांमध्ये देखील अंशतः पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर या संकुलात शिरलेले पावसाचे पाणी अक्षरशः युद्ध पातळीवर उपसून गाळणी व उदंचन यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. दुरुस्ती करण्‍यात आली. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून उदंचन करणारे पंप टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरु करण्‍यात आले आणि रविवारी सायंकाळपासूनच पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.

(हेही वाचा : पेंग्विन गँगची पालिकेत वाझेगिरी! भाजपचा आरोप)

‘२६ जुलै’च्या अतिवृष्टीतही पम्पिंग स्टेशन सुरक्षित होते!

या घटनेनंतर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांच्याकडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली. २६ जुलै २००५ रोजी यापेक्षा मोठी अतिवृष्टी झाली होती, पण या संकुलात पाणी शिरले नव्हते. ज्यादिवशी विहार तलाव ओसंडून वाहू लागला, त्याच दिवशी हा प्रकार घडला आहे. सर्वसाधारणपणे पंपिंग स्टेशनच्या आत येणारे पाणी विहार तलावात नैसर्गिकरित्या जाते, ते का गेले नाही? या प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे. विहार तलावात पंपिंग स्टेशनमधील पाणी वाहून जाण्याच्या मार्गात काही अडथळा निर्माण झाला होता का? असेल तर त्याची कारणे काय आहेत? भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून यावर काय उपाय करता येईल याचा सविस्तर अहवाल प्रशासनाने सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.