रस्ते कामांच्या निविदेत सुधारीत दर वाढवून दिल्यामुळे त्यांनी अंदाजित दरापेक्षा जी ८ ते १० टक्के अधिक दरात बोली लावत काम मिळवले होते, ते त्यांना अंदाजित दरामध्ये करण्यासंदर्भात वाटाघाटी केल्या. त्याला त्यांना तयारी दर्शवल्याने महापालिकेचे १००० ते १३०० कोटी रुपये कमी झाले असे सांगत शिवसेना उबाठा गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्यामुळे रस्ते कंत्राट कामांचे १ हजार कोटी रुपये वाचले असल्याचा दावा केला, तो महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी खोडून काढला.
शिवसेना उबाठा गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत सुमारे सहा हजार कोटींच्या रस्ते सिमेंट काँक्रिट कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून शिंदे सरकारने मित्र असलेल्या कंत्राटदारांना कामे दिल्याचा आरोप केला. तसेच आपण हा विषय लावून धरला म्हणून एक हजार कोटी रुपये वाचवू शकलो,असाही दावा त्यांनी केला होता. याबाबत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पत्रकार परिषद घेऊन रस्ते सिमेंट काँक्रिट कामांची सच्चाई काय याबाबतची माहिती दिली. याबाबत बोलताना, मुंबईत मागील वर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांच्या समस्येनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायमचीच खड्डयांची समस्या निकाली काढून खड्डेमुक्त रस्ते बनण्याच्या सुचना केल्या. परंतु त्यानंतर त्यांचा कोणताही हस्तक्षेप नसून प्रशासनाने पुढील सर्व प्रक्रिया पार पाडली असल्याचे सांगितले.
मुंबई मेट्रोची ४०० कि.मी कामे सुरु आहेत, शिवाय किनारी रस्ता प्रकल्पाचे कामही वेगाने सुरु आहेत. त्यामुळे खड्डे विरहित रस्ते हे मोठे आव्हान असून महानगरपालिका हे आव्हान निश्चित पेलणार आहे.
(हेही वाचा Cabinet Expansion : आता फक्त १४ मंत्रीपदे शिल्लक; इच्छुकांची समजूत काढताना शिवसेनेसह भाजपाचीही होणार दमछाक)
सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते कामाच्या ५ हजार ८०७ कोटी रुपयांची निविदा काढताना यासाठी २०१८ची दरसुची लागू करण्यात आली होती. परंतु ही दरसुची जुनी झाल्याने त्यानुसार काम करण्यास कंत्राटदार तयार नसल्याने ही निविदा रद्द करून सुधारीत २०२३ची दर सूची लागू करून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. या सुधारीत २०२३च्या दर सुचीमुळे कंत्राट कामांचा खर्च १७ टक्क्यांनी वाढला आणि शिवाय जीएसटीही १२ टक्क्यांनी १८ टक्के झाला. त्यात सहा टक्यांनी वाढ झाल्याने एकूण खर्च २३ टक्क्यांनी वाढला गेला. त्यातच कंत्राटदारांनी अंदाजित खर्चापेक्षा ८ ते १० टक्के अधिकचा दर लावल्याने हा खर्च अधिक टक्क्यांनी वाढला गेला होता. त्यामुळे महापालिकेने कंत्राटदारांशी वाटाघाटी करून अंदाजित दरामध्येच काम करण्यासाठी सूचना केली. त्यामुळे त्यांनी महापालिकेच्या अंदाजित दरामध्येच काम करण्यास तयारी दर्शवली. परिणामी ८ ते १० टक्के दर कमी झाला. यामुळे निव्वळ ६०० कोटी रुपयांचा फायदा झाला. त्यामुळे ६०८० कोटींचे कंत्राट काम देण्यात आले. त्यामुळे विविध करांसह कोटी रुपये वाचले असल्याचे सांगत महापालिका प्रशासाने शिवसेना उबाठा गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या तक्रारीमुळे महापालिकेचे रस्ते सिमेंट काँक्रिट कंत्राट कामांमध्ये हजार कोटी रुपये वाचवले असा जो दावा केला, त्याची सत्यता मांडत चहल यांनी हा दावाही खोटा पाडला.
सर्व कंत्राटदारांना महापालिकेच्या अंदाजित दरानुसारच कामांचा कार्यादेश बजावण्यात आला असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे सन २०१६मध्ये रस्ते घोटाळा उघडकीस आला. त्यामध्ये अनेक कंत्राटदारांना काळ्यात यादीत टाकण्यात आले. त्यामुळे आजवर रस्ते डांबरीकरणाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या तुलनेत द्रुतगती महामार्ग, मोठे महामार्ग बनवणाऱ्या कंपन्या तसेच ज्यांच्याकडे चांगल्या दर्जाचे तंत्रज्ञान आहे, यंत्रे आहेत अशा मोठ्या कंत्राटदारांकडून ही कामे करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच पाकिटे तयार करून निविदा मागवल्या, ज्यात महामार्ग तथा मोठ्या रस्त्यांची कामे करणाऱ्या कंपन्यांनी भाग घेतला, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community