-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुलुंड डम्पिंग ग्राऊंड (Mulund Dumping Ground) येथे जमीन पुनः प्राप्त करण्यासाठी मुलुंड क्षेपणभूमी येथे जून २०२५ पर्यंत ७० लाख मेट्रिक टन इतक्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावून क्षेपणभूमीची २४ हेक्टर जमीन पुनःप्राप्त करण्याकरिता महानगरपालिकेने प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु जून २०२५ पर्यंत केवळ १० हेक्टरच अर्थात २५ एकर एवढीच जागा मोकळी करून दिली जाणार आहे.
मुंबईतील मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील (Mulund Dumping Ground) कचऱ्याची विल्हेवाट लावून ते जमिनसपाटीला आणण्याच्या कामाला सन २०१८ मध्ये सुरुवात झाली. हे काम पुढील सहा वर्षांमध्ये पूर्ण होऊन डम्पिंग ग्राऊंडची जागा पूर्णपणे प्राप्त व्हायला हवी होती, परंतु यासाठी नेमलेल्या कंपनीकडून कचरा विल्हेवाटीचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. आतापर्यंत याठिकाणी असलेल्या ७० लाख मेट्रिक टनाची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते, पण २८ मार्च २०२५ पर्यंत एकूण ५५ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात यश आले आहे.
(हेही वाचा – Atrocity च्या गुन्ह्यात पोलिसांची चालढकल; पिडित महिलेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार)
मागील ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे ४०.९३ लाख मेट्रिक टन जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे १८.३७ लाख मेट्रिक टन जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावण्याचे नियोजित होते. परंतु आतापर्यंत एकूण ५५ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांत १०.७० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित मानले जात असतानाच तब्बल १५ ते १८ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे बाकी असल्याचीही माहिती मिळत आहे. (Mulund Dumping Ground)
मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेतलेल्या या प्रकल्पाचे काम जून २०२५ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु जून २०२५ पर्यंत २४ हेक्टर पैकी केवळ १०.१२ हेक्टर जमिनच पुनर्प्राप्त होणार आहे. त्यामुळे एकूण ५० एकर पैकी जून २०२५ पर्यंत केवळ २५ एकरच जागा प्राप्त होणार असल्याची महिती मिळत आहे. धारावी विकास प्रकल्पांतर्गत नेमलेल्या कंपनीला अपात्र कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची पुनर्प्राप्त जमिनीची मागणी करण्यात आली होती. या पुनर्प्राप्त जमिनीपैंकी १५ एकर जागेवर धारावीतील कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही ही जमिनी धारावी विकास प्रकल्पासाठी अदानी कंपनीला देण्याबाबत कोणताही निर्णय तथा मंजुरी प्राप्त झाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. (Mulund Dumping Ground)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community