कोरोनापासून वाचायचे! मग अशी घ्या काळजी! 

कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून वर्षभरापूर्वी आपण घरात, सार्वजनिक ठिकाणी,  सोसायटी,  कार्यालय, बाजारात, फिरताना, बोलताना जी काळजी घेतली जायची, तशीच पुन्हा घेण्याची गरज बनली आहे.  

106
कोविड नियंत्रणासाठी कोरोनासोबत नव्याने आणि नव्या जीवन शैलीसह जगायला शिकणे, ही आजची गरज असून यासाठी काही नियम आणि मार्गदर्शक सूचना नागरिकांनी अंगिकारणे आवश्‍यक झाले आहे. यासाठी वैयक्तीक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत परिणामकारक अशी अत्यंत आवश्‍यक त्रिसूत्री मुंबई महापालिकेच्यावतीने जारी करण्यात आली आहे. त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पूर्वी आपण घरात, सार्वजनिक ठिकाणी,  आपल्या सोसायटीत,  कार्यालयात, बाजारात, फिरताना, बोलताना जी काळजी घ्यायचो, तशी काटेकोरपणे काळजी घेण्याची आज खूप गरज आहे. या सर्व ठिकाणी वावरताना काय काय प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी; याबाबतच्या सूचना पुन्हा जारी करण्यात आल्या आहेत.

वैयक्तीक स्‍तरावर अशी घ्या काळजी!

  • रोज सकाळी शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी मोजून घ्यावी. हे आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे.
  • मास्कचा सदैव उपयोग करावा. मास्‍क काढून ठेवू नये. नाकाखाली/चेह-याखाली मास्‍क न ठेवता सुयोग्यय प्रकारे लावावा. याबाबत कुटुंबातील सदस्‍यांनी एकमेकांविषयी काळजी घ्‍यावी.
  • चेह-याला तसेच मास्‍कला वारंवार हात लावू नये.
  • एकदाच वापरात येणारे मास्‍क (सिंगल यूज मास्‍क) वापरुन झाल्‍यानंतर ते टाकून देण्‍यापूर्वी, त्यावर निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) शिंपडून, त्‍यांचे तुकडे करुन नंतर टाकावेत. जेणेकरुन त्‍यांचा पुन्‍हा वापर करण्‍यासाठी गैरउपयोग केला जाणार नाही.
  • सॅनिटायझरची लहान बाटली सातत्‍याने सोबत बाळगावी. त्‍याचा गरजेनुसार उपयोग करत रहावा.
  • हातांची नियमितपणे स्‍वच्‍छता राखावी. साबणाने हात वारंवार स्‍वच्‍छ धुवावेत. हात धुण्यासाठी सॅनीटायझर व साबण असे दोन्ही पर्याय उपलब्ध असल्याास साबणाने हात धुण्यास प्राधान्य द्यावे.
  • स्वच्छ हातरुमाल बाळगावा. सर्दी, खोकला असल्‍यास स्‍वच्‍छ मास्‍क, रुमाल यांचा सातत्‍याने उपयोग करावा.
  • कुटुंबातील सदस्‍यांनी शक्‍यतो वेगवेगळ्या स्‍वरुपाचे किंवा वेगवेगळ्या रंगाचे ‍मास्क वापरावे अथवा प्रत्येकाने आपल्या मास्‍कला वेगळी स्वतंत्र खूण करावी. जेणेकरुन प्रत्‍येकाचा मास्‍क ओळखला जाईल. एकमेकांचे मास्‍क वापरु नये.
  • कोणाशीही बोलत असताना एकमेकांच्या चेह-याकडे थेटपणे बघू नये
  • जेवताना एकाच भांड्यात किंवा पातेल्यात पदार्थ घेण्याऐवजी ते आवश्यकतेनुसार एकदाच ताटात घ्यावेत.
  • जेवताना मौन ठेवावे किंवा कमीत कमी बोलावे. तसेच शक्य असल्यास जेवण करताना समोरासमोर बसू नये.
  • जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्‍व, प्रथिने अशा सर्व पोषक बाबींनी युक्‍त पदार्थ असावेत.
  • पुरेसा व योग्‍यवेळ आहार, पुरेशी झोप, व्‍यायाम – योग – प्राणायाम आदीद्वारे प्रतिकारशक्‍ती टिकवून ठेवावी.
  • कोणतेही वाहन चालवताना, वाहनांतून प्रवास करतानाही मास्‍कचा वापर करणे आवश्‍यक आहे. कारण वाहन थांबवून वाहतूक पोलीस किंवा इतरांशी बोलताना नकळत मास्क नसल्यास संसर्गाचा धोका पोहोचतो.
  • बंदिस्त वातावरण टाळावे. याचप्रमाणे गर्दीत जाणे किंवा निकटचा संपर्कही टाळावा. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर शक्यतो टाळावा.
  • अरुंद ठिकाणी जास्त वेळ थांबू नये.
  • चालायला-धावायला गेल्यानंतर त्या ठिकाणी कमीत कमी व्यक्ती व सुरक्षित अंतरावर असतील, असे पहावे.
  • सार्वजनिक ठिकाणी वावरताना थुंकू नये.
  • दरवेळी बाहेरून/कार्यालयातून घरी परतल्‍यावर सर्वप्रथम आंघोळ करावी व कपडे धुण्‍यासाठी थेट एका बादलीमध्‍ये टाकावेत.
  • बाहेरून आलेल्या व्यक्ती घरात प्रवेश केल्यानंतर थेट स्नानगृहात जाताना ज्या ज्या ठिकाणावरून चालत गेली असेल, ती जागा प्रथम साबणाच्या पाण्याने पुसून घ्यावी. त्यानंतर केवळ पाण्याने भिजवलेल्या ओल्या फडक्याने व नंतर कोरड्या फडक्याने पुसून कोरडी करावी
  • कोविड विषाणूचा अधिक प्रादुर्भाव असणा-या परिसरांना/शहरांना/राज्‍यांना/ देशांना भेट देणे टाळावे.
  • जर ‘कोविड – १९’ ची लक्षणे असतील, तर आपण कुठे-कुठे गेलो होतो आणि कोणा-कोणाला भेटलो, ते आठवावे. शक्‍यतोवर भेटीच्‍या नोंदी ठेवाव्‍यात.
  • शक्यतो बाहेर जाणार्‍या व्यक्तीने सकाळी आणि सायंकाळी कोमट पाणी पिणे आणि गरम वाफ घेणे योग्य राहील.
  • शक्यतो घरचे खाणे व घरचे पाणी पिणे यास प्राधान्य द्यावे. घराबाहेर पडताना आपल्या घरच्या पिण्याच्या पाण्याने भरलेली बाटली सोबत ठेवावी. जास्त वेळ बाहेर राहणार असल्यास घरूनच जेवणाचा डबा सोबत घेऊन निघावे. घरी परतल्यावर ही पाण्याची बाटली किंवा जेवणाचा डबा साबणाच्या द्रावणाने नीट धूवून व पुसून घ्यावा.

(हेही वाचा : कोरोना काळात इमारत, सोसायट्यांनी कोणती घ्यावी काळजी? वाचा महापालिकेच्या सूचना!)

कौटुंबिक स्‍तरावर अशी घ्या काळजी!

  • कुटुंबात वावरताना, कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्‍त्‍वांचे, सुचनांचे अनावधानाने कोणाकडून उल्‍लंघन होत असल्‍यास, ते एकमेकांच्‍या लक्षात आणून द्यावे.
  • प्राणवायू पातळी मोजण्‍यासाठी आवश्‍यक असलेले उपकरण (ऑक्सिमीटर) सदैव बाळगावे. कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍याची प्राणवायू पातळी ठराविक कालावधीने तपासून त्‍यांच्‍या अचूक नोंदी ठेवाव्‍यात.
  • शारीरिक तापमापक (थर्मामीटर) / थर्मल स्‍क्रीनिंग गन घरात असावी व त्याचा नियमितपणे सुयोग्यय वापर करावाा.
  • घरातील लहान मुले, ज्‍येष्‍ठ नागरिक यांच्‍या प्रकृतीमानाकडे विशेष लक्ष पुरवावे.
  • घरातील ज्‍या सदस्‍यांना सहव्‍याधी (को-मॉर्बिडीटी) असतील, ते नियमितपणे औषधोपचार घेत असल्याची व ‍त्यांची प्रतिकारशक्‍ती टिकून राहील, याची काळजी घ्‍यावी.
  • कुटुंबात एकत्र सोबतीने जेवायला बसताना समोरासमोर न बसता एका बाजूला एक याप्रमाणे बसावे.
  • शक्‍यतो घरातील एकाच सदस्‍याने कौटुंबिक कामांसाठी बाहेर ये-जा करावी व त्‍या सदस्‍याने अशी ये-जा करताना संपूर्ण दक्षता घ्‍यावी.
  • घरातील प्रत्‍येक सदस्‍याने दररोज स्‍वच्‍छ कपडे परिधान करावेत. न धुता कपड्यांचा पुन्‍हा वापर करु नये.
  • भ्रमणध्‍वनी सारख्‍या वैयक्तिक वापराच्‍या वस्‍तू कुटुंबातील सदस्‍यांनी एकमेकाकडे घेऊन/अदलाबदली करुन वापरु नयेत. अशा वस्‍तूदेखील योग्‍यरित्‍या स्‍वच्‍छ राहतील, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. शक्य असल्याास बाहेर जाताना भ्रमणध्वनीवर प्लास्टिकचे पारदर्शक आच्छादन वापरावे व घरी परतल्यावर प्लास्टिकच्या आवरणास साबण लावून धुुण्यास टाकावे.
  • खाद्यपदार्थांचे पार्सल मागवले असल्‍यास ते स्‍वयंपाकगृहात खूप वेळ राखून ठेवू नये. पदार्थ काढून झाल्‍यानंतर आवरण, डबे आदींची तातडीने विल्‍हेवाट लावावी.
  • बाजारातून आणलेल्‍या भाज्‍या, फळे आदी स्‍वच्‍छ धुवून ठेवावेत. नंतरच त्‍याचा आहारात समावेश करावा.
  • ऑनलाईन/बाहेरुन पार्सल मागवले असल्‍यास, नाशवंत पदार्थ नसतील तर किमान एक दिवस ते पार्सल तसेच ठेवून द्यावे. त्याच्या आवरणावर निर्जंतुकीकरण द्रव्‍य फवारावे. दुस-या दिवशी ते उघडावे.
  • घरातील फरशी, स्‍वयंपाकगृह, प्रसाधनगृहे, इतर वापराच्‍या वस्‍तू यांची नियमितपणे योग्‍य अशा निर्जंतुकीकरण द्रव्‍याचा उपयोग करुन स्‍वच्‍छता करावी.
  • भारतीय बनावटीचे शौचालय असल्‍यास ते व्‍यवस्थित स्‍वच्‍छ राखावे. पाश्‍चात्‍त्‍य बनावटीच्‍या शौचालयातील भांड्यावरील झाकण ‘फ्लश’ करताना बंद ठेवावे.
  • नातेवाईक – मित्र इत्यादींकडे जाणे टाळावे. त्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकांशी संवाद साधण्यास प्राधान्य द्यावे.
  • कौटुंबिक समारंभ, पार्टी यांचे आयोजन करुच नये. निमंत्रित करणे अपरिहार्य असल्‍यास सरकारने ठरवून दिलेल्‍या मर्यादेतच निमंत्रण द्यावे आण‍ि अशा ठिकाणी आवश्‍यक त्‍या सर्व उपाययोजना कराव्‍यात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.