झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी कशी कराल; BMC ने दिले कंत्राटदारांच्या कामगारांना प्रशिक्षण

469
झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी कशी कराल; BMC ने दिले कंत्राटदारांच्या कामगारांना प्रशिक्षण
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत असली तरी अनेकदा कंत्राटदारांकडून मोठ्या लाकडाच्या हव्यासपोटी खोडापर्यंत झाडे कापली जातात. त्यामुळे अनेकदा झाडांचे सौदर्य निघून जाते आणि बऱ्याचदा झाडांच्या फांद्यांची कापण शास्त्रोक्तपणे न झाल्याने पुन्हा ते झाड न बहरता त्याला जखम होऊन त्याला धोका निर्माण होतो. यामुळे स्थानिकांकडून नोंदवल्या जाणाऱ्या आक्षेपांची दखल घेत महापालिकेच्या उद्यान विभागाने प्रत्येक विभागीय कार्यालयांच्या हद्दीत नेमलेल्या कंत्राटदारांच्या कामगारांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे किमान यंदातरी झाडांच्या फांद्यांची छाटणी खोडापर्यंत कापली जाणार नाहीत अशाप्रकारचा विश्वास व्यक्त केला जात आहे. (BMC)

पावसाळ्यात वादळीवारे तसेच मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड होऊ नये म्हणून मुंबईतील रस्त्यालगतच्या धोकादायक झाडांसह इतर झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते. दरवर्षी सरासरी १ लाख झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते. या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांकरता स्वतंत्र कंत्राटदारांची निवड केली जाते. यामध्ये कंत्राटदारामार्फत झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केल्यानंतर त्या झाडांच्या फांद्या आणि पालापाचोळा वाहून नेत त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराकडे असते. (BMC)

New Project 2025 03 20T191013.116

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स विजेत्या भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांची खैरात)

महापालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने परिमंडळ दोनमधील सर्व विभागांमधील निवड केलेल्या कंत्राटदारांच्या कामगारांसह मुकादम, महापालिकेचे उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना बुधवारी १९ मार्च २०२५ रोजी जी -उत्तर विभाग कार्यालयातील सभागृहामध्ये उप उद्यान अधीक्षक घुले यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष छाटणीशी संबंधित कामगार कर्मचारी अधिकारी यांच्याकरिता शास्त्रीय पद्धतीने वृक्ष छाटणी करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उद्यान विभागाचे सहायक उद्यान अधिक्षक अविनाश यादव यांनीही सर्वांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाकरिता परिमंडळ दोन मधील जी उत्तर, जी दक्षिण, एफ उत्तर व एफ दक्षिण विभागातील महानगरपालिकेचे तसेच कंत्राटदाराचे कामगार कर्मचारी उपस्थित होते. (BMC)

उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी कापण्यात येणाऱ्या झाडांच्या फांद्या या चुकीच्या पध्दतीने कापल्यास त्यामुळे झाडाला जखम निर्माण होवून धोका पोहोचतो. त्यामुळे झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना योग्य जागी आणि योग्यप्रकारेच कापले जावे, जेणेकरून त्या जागी पुन्हा पाने आणि फुले लागून ते बहरले जाईल.तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना खोडापर्यंत करून त्यांचे सौदर्य नष्ट केले जाऊ नये अशाप्रकारच्या सूचना या सर्व कामगारांना करण्यात आल्या आहेत. महापालिकेने निवड केलेल्या कंत्राटदारांचा कालावधी जुनपर्यंत असून त्यानंतर नवीन कंत्राटदारांची निवड केली जाणार असली तरी प्रत्यक्षात मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी याच कंत्राटदारांकडून केली जाणार आहे. तसेच कंत्राटदार बदलले तरी विभागातील कामगार आणि कर्मचारी तेच असल्याने यासर्वांना प्रशिक्षण दिल्याने योग्यप्रकारे आणि शास्त्रोक्तपणे झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जातो. (BMC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.