१२वीच्या १६ लाख विद्यार्थ्यांचा अवघ्या १७ दिवसांत निकाल तयार होणार!

राज्यभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना १२वीच्या निकालाचे काम ७ जुलै ते २३ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा अल्टिमेटम एचएससी बोर्डाने दिला आहे.

दहावीच्या निकालाचे काम आटोपल्यावर आता उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळ अर्थात एचएससी बोर्डाने इयत्ता १२वीच्या निकालाचे वेळापत्रक जाहीर केले. राज्यभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना १२वीच्या निकालाचे काम ७ जुलै ते २३ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा अल्टिमेटम बोर्डाने दिला आहे. त्यानंतर ३१ जुलै रोजी १२वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली.

एसएससीनंतर आता एचएससी बोर्ड करणार विश्वविक्रम!

यंदाच्या वर्षी १२वीसाठी १६ लाख विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करावा लागणार आहे. त्यासाठी बोर्डाने २३ जुलै ही अंतिम मुदत कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे. त्यामुळे केवळ १७ दिवसांत महाविद्यालयांना १६ लाख विद्यार्थ्यांचा निकाल तयार करावा लागणार. ज्याप्रमाणे दहावीच्या १७ लाख विद्यार्थ्यांचा निकाल १७ दिवसांत लावण्याचा विश्वविक्रम एसएससी बोर्डाने केला, तसाच विश्वविक्रम एचएससी बोर्डालाही १२वीच्या १६ लाख विद्यार्थ्यांचा निकाल अवघ्या १७ दिवसांत तयार करून करावा लागणार आहे.

(हेही वाचा : १५ दिवसांत १७ लाख विद्यार्थ्यांचा निकाल तयार होणार! एसएससी बोर्ड विश्वविक्रम करणार!)

असे होणार मूल्यमापन!

यंदाच्या १२वीच्या निकालासाठी ३०:३०:४० चे सूत्र याआधीच जाहीर झाले आहे. हे सूत्र सीबीएसई मंडळाच्या धोरणावरच अवलंबून आहे. यात दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्क्यांच्या गुणांचा अंतर्भाव असेल. आता, या मुल्यमापन निकालाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

हे आहे निकालाचे वेळापत्रक!

कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाची कार्यवाही कशी आणि कधीपर्यंत करावी, याचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, अंतर्गत मूल्यमापनाचे काम शिक्षकांना ७ जुलैपासून सुरु करायचे असून २३ जुलैपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण करायचे आहे. तसेच, निकाल तयार करून मंडळाकडे पाठवायचे आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यासाठी १४ जुलै ते २१ जुलै दरम्यान वेळ देण्यात आला आहे. त्यासोबतच समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात २१ जुलै ते २३ जुलै या कालावधीत जमा करायचे आहेत. त्यानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल विभागीय मंडळ व राज्य मंडळ स्तरावर पुढील प्रक्रिया केली जाणार असून ३१ जुलैपर्यंत बारावी बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसह कमाल ७ सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्याच्या सूचनाही शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.

(हेही वाचा : दहावीच्या निकालाला लागणार ‘लेटमार्क’!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here