बारावीचा फुगलेला निकाल! ५०-६० हजार विद्यार्थी प्रवेशापासून राहणार वंचित?

शहरी भागातील महाविद्यालयांना प्रवेशपूर्व परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी पडताळून घ्यायची आणि कुठल्या आधारे मेरिट लिस्ट तयार करायची, असा प्रश्न पडला आहे.

राज्यात यंदा कोरोना महामारीमुळे बारावी परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीचा निकालही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्यात आला. परिणामी यंदाच्या वर्षीचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के लागला. आजवरच्या इतिहासात बारावीचा इतका निकाल लागला नाही. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थी संख्या ही तब्बल १४ लाखांच्या वर पोहचली आहे. फुगलेल्या या निकालामुळे आता विद्यापीठांसमोर इतक्या मोठ्या संख्येने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमात प्रवेश कसा द्यायचा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर शहरी भागातील महाविद्यालयांना प्रवेशपूर्व परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी पडताळून घ्यायची आणि कुठल्या आधारे मेरिट लिस्ट तयार करायची, असा प्रश्न पडला आहे.

५०-६० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित? 

यंदाच्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या निकालामध्ये नियमित १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ६३ हजार ६३ विद्यार्थी हे पुनर्परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले आहेत. याशिवाय २६ हजार ३०० विद्यार्थी हे खासगीरित्या बसलेले होते ते उत्तीर्ण झाले आहेत. यावरून एकट्या महाराष्ट्र बोर्डातून तब्बल १४ लाख ४ हजार २९८ विद्यार्थी हे बारावीत उत्तीर्ण झाले आहेत. याव्यतिरिक्त अन्य बोर्डातील उत्तीर्ण झालेले आणि परराज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ही संपूर्ण संख्या साडे चौदा लाखांपर्यंत पोहचणार आहे. त्या तुलनेत पदवी अभ्यासक्रमासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक शाखांसाठी १० लाख जागा उपलब्ध झाल्या आहेत. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी साधारण ४ लाखांपर्यंत जागा उपलब्ध होणार आहेत. हे पाहता ५० ते ६० हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

आम्हाला प्रवेश देताना गुणवत्ता कशी पडतळायची, असा प्रश्न पडला आहे. मुंबई विद्यापीठ जे दिशानिर्देश देईल त्याप्रमाणे आम्ही तातडीने प्रवेशप्रक्रिया सुरु करणार आहोत. मात्र प्रवेशपूर्व परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने महाविद्यालयांना त्यांचे मेरिट कायम राहील अशा प्रकारे मेरिट लिस्ट काढताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
– अनुश्री लोकूर, प्राचार्य, रुईया महाविद्यालय

(हेही वाचा : दिल्लीत चहापान, राज्यात मात्र फोडाफोडीचे काम!)

प्रवेशपूर्व परीक्षेशिवाय द्यावे लागणार प्रवेश! 

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येऊ नये, असे सांगितले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये विशेषतः मुंबईत महाविद्यालयांमध्ये प्रवेश कसे द्यायचे असा प्रश्न पडला आहे. कारण १०वीचा निकाल लागल्यानंतर ११वीत प्रवेश देण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली होती. तशी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार नाही. त्यामुळे महाविद्यालयांना प्रवेश देताना, मेरिट लिस्ट काढताना गुणवत्ता कशावरून पडताळून पाहायची, असा प्रश्न पडला आहे.

अतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी तुकड्या वाढवाव्या लागणार! 

दरम्यान ज्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्या तुलनेत पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात जागा उपलब्ध नाहीत, त्यावेळी अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी वेळ प्रसंगी महाविद्यालयांमध्ये तुकड्या वाढवाव्या लागणार आहेत. मात्र वाढीव तुकड्यांना अनुदान मिळणार का कि त्या विनाअनुदानित तत्वावर वाढवाव्या लागणार, मग त्यावर नियंत्रण संपूर्ण महाविद्यालयांचे असणार का, त्यात प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागल्यास सरकारचा हस्तक्षेप राहणार नाही का, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here