गाढवं नामशेष होणार! झपाट्याने होतेय घट, सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा

127

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यावर दिसणारं गाढवं आता नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत समाविष्ट झालं आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल हे नक्की… कारण बांधकाम कामात, विशेषत: सामान वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाढवांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, अशी माहिती ब्रुक इंडिया (BI) ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. देशभरातील एकूण गाढवांच्या संख्येत 61.23 टक्क्यांनी घट झाली आहे. संस्थेने हा अहवाल शासनाच्या पशुसंवर्धन विभागाला सादर केला आहे. सर्वेक्षण अहवालानुसार, 2012 आणि 2019 च्या पशुगणनेदरम्यान, भारतातील एकूण गाढवांच्या संख्येत 61.23 टक्क्यांनी घट झाली आहे, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये गाढवांची कत्तल केली जात आहे. 2012 च्या जनगणनेनुसार, भारतात सुमारे 0.32 दशलक्ष गाढवे आहेत. 2019 च्या पशुधन गणनेनुसार, त्यात 0.12 दशलक्षने घट झाली आहे.

ब्रुक इंडिया संस्थेचे सदस्यांनी दिली माहिती

हे सर्वेक्षण करणाऱ्या ब्रुक इंडिया संस्थेचे सदस्य शरथ के. वर्मा म्हणाले की, गाढवांच्या संख्येत सुमारे 61.23 टक्के घट झाली आहे. बीआय टीमने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांना भेटी दिल्या. 2012 आणि 2019 च्या पशुगणनेत गाढवांच्या संख्येत घट दिसून आली. घसरणीचा तपशील जाणून घेण्यासाठी आम्ही अनेक गाढव मालक, गुरेढोरे व्यापारी, पशु मेळ्यांचे आयोजक आणि राज्य आणि केंद्रीय पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी बोललो, असेही त्यांनी सांगितले.

चीनच जबाबदार

एका स्थानिक गाढव व्यापार्‍याचा संदर्भ देत वर्मा म्हणाले, “काही वर्षांपूर्वी चीनमधील एका व्यक्तीने महिन्याला 200 गाढवे विकत घेण्यासाठी त्याच्याकडे संपर्क साधला. तो म्हणाला त्याला गाढवाची कातडी हवी आहे.” ते पुढे म्हणाले की, जिवंत गाढवे, त्याची कातडी आणि मांस यांची निर्यात बेकायदेशीरपणे केली जात आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील गाढवांची संख्या घटल्याबद्दल चीनला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार धरले जात आहे. कारण ‘इजियाओ’ नावाचे पारंपरिक चिनी औषध बनवण्यासाठी गाढवाच्या कातडीचा ​​वापर केला जातो. ते म्हणाले, “आयुष्य वाढवण्यासाठी आणि सेक्स ड्राइव्हसाठी इजियाओ उपयुक्त असल्याचे मानले जाते. यासोबतच इतर आजार बरे करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

गाढवाच्या मांसाला मागणी

देशाच्या काही भागात गाढवाच्या मांसाला मोठी मागणी आहे, कारण त्याचे आरोग्य फायदे आहेत असे मानले जाते. हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे गाढवांची संख्या कमी झाली आहे. तथापि, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानुसार, गाढवाचे मांस खाण्यासाठी वापरता येत नाही. गाढवाचे मांस खाणे चुकीचे आहे. या संदर्भात IANS ने सांगितले की, त्याची चौकशी आंध्र प्रदेशात सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.