एसटी कर्मचाऱ्यांच्या पती-पत्नीमधील संपणार दुरावा!

चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी अशा एकूण १६४ बदल्या तीन वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित असून पर्यवेक्षक व अधिकारी अशा एकूण २८ बदल्या प्रलंबित आहेत.

गेले तीन वर्षे एसटी महामंडळात पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या रडखडल्या असून त्याचा फटका दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांना बसला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना नवरात्रोत्सवाची भेट मिळावी यासाठी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे.

नवरात्रोत्सव भेट 

राज्यशासनामधील कर्मचाऱ्यांच्या पती पत्नी यांच्या एकत्रीकरण बदल्या कराव्यात, असे पत्र ठाकूर यांनी हल्लीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले व नवरात्रोत्सव सुरू असताना महिला कर्मचाऱ्यास एक आगळी वेगळी भेट मिळावी यासाठी प्रयत्न केला. त्याच प्रमाणे एसटीतील पती-पत्नीच्या एकत्रीकरणासाठी ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे.

परिवहन मंत्र्यांना पत्र 

राज्य सरकारच्या पती-पत्नी एकत्रीकरण बदली नियमानुसार एसटीमधील पती -पत्नी एकत्रीकरण बदल्या करण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी ठाकूर यांना प्रत्यक्ष भेटून केली होती. त्याला तात्काळ प्रतिसाद देत त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून एसटीमधील पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या करण्यात याव्यात, असे पत्र दिले आहे.

(हेही वाचा : धक्कादायक! ‘या’ भागात शाळकरी मुलगा निघाला कोरोनाबाधित)

१६४ बदल्या प्रलंबित 

बरगे म्हणाले की, कोरोना काळात एसटीमधील महिला व पुरूष कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता मुंबईकरांची सेवा उत्तम रीतीने बजावली असून त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याना ज्या सोई सुविधा मिळाल्या त्या मिळाल्या नाहीत. तरीही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निदान नियमानुसार होणाऱ्या बदल्या करण्यात आल्या पाहिजेत. पण त्या विनाकारण प्रलंबित आहेत. चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी अशा एकूण १६४ बदल्या तीन वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित असून पर्यवेक्षक व अधिकारी अशा एकूण २८ बदल्या प्रलंबितआहेत. एसटीमध्ये काम करीत असलेल्या महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी रहावे लागत असल्याने त्यांना कौटुंबिक त्याच प्रमाणे विविध समस्याना सामोरे जावे लागत आहे. एकतर इतरांच्या तुलनेत वेतन कमी मिळते. त्यात पती- पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्याने  खर्चात वाढ होते आणि स्वतःच्या पाल्याकडे लक्ष सुद्धा देता येत नाही, त्यांच्या शिक्षणाचे नुकसान होते. अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच महागाईने सुद्धा थैमान घातले असल्याने दोन दोन ठिकाणी संसार चालवणे भाग पडत असल्याचे आर्थिक ओढाताण होत असल्याची तक्रार अनेक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी एसटी प्रशासनाकडे करून सुद्धा त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या बदल्या तात्काळ करून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात यावा व महिला कर्मचाऱ्यांना नवरात्रोत्सवाची भेट द्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या वेळी संघटनेचे कोषाध्यक्ष संतोष गायकवाड, मुंबई सेंट्रल आगाराचे सचिव संदीप कातकर हे सुद्धा हजर होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here