महापालिका खुली करणार आंतरराष्ट्रीय शिक्षणाची दारे!

156

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, पर्यायाने त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये व कारकीर्दीत गुणवत्तापूर्ण सुधारणा व्हावी, यासाठी राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून सीबीएसई व आयसीएसई अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर आता इंटरनॅशनल बॅकॉलॉरेट (I. B. – International Baccalaureate) अर्थात आय. बी. या आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम देखील लवकरच सुरु होणार आहे. या अनुषंगाने पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासनाचे उच्च पदस्थ अधिकारी आणि आय. बी. बोर्डाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.

आय. बी. बोर्डच्या शाळा सुरू होणार

‘आय.बी. बोर्ड’ च्या शाळांमध्ये नर्सरी ते १० वी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये ३ ते १२ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी व नर्सरी ते ५ वी च्या वर्गांसाठी PYP ( Primary Year Programme ) तसेच ११ ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ६ वी ते १० वी च्या वर्गांसाठी MYP (Middle Year Programme) अंतर्गत मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. आय. बी. बोर्डच्या शाळा सुरू करण्याची आवश्यक ती सर्व कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहे. यामुळे येत्या जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेची आय. बी. बोर्डची एक व आय. जी. सी. एस. ई. बोर्डची एक शाळा सुरू होणार आहे.

( हेही वाचा : पुण्यात तिळावर दरवाढीची ‘संक्रांत’! )

आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

सर्वसामान्य विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण विनामूल्य मिळावे, यासाठी पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून ११ सीबीएसई व १ आयसीएसई शाळा यशस्वीरित्या सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विभागामध्ये किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे. आता त्याही पुढे जाऊन महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण व ते देखील विनामूल्य मिळावे, यासाठी पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आय. बी. बोर्डचे अधिकारी तसेच महानगरपालिका प्रशासनातील उच्चस्तरिय अधिकारी यांची ही संयुक्त बैठक पार पडली. येत्या शैक्षणिक वर्षात आय. बी. बोर्डची शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच सर्वसामान्यांसाठी याद्वारे मोफत व सर्वोच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षणाची दारे बृहन्मुंबई महानगरपालिका खुली करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.