इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडासंकुल असणे आवश्यक आहे. खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी इचलकरंजीला क्रीडासंकुल निश्चितपणे मंजूर करुन देईन, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इचलकरंजी वासियांना दिला.
इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे (Vitthal Ramji Shinde) प्रशाला येथे कल्लाप्पा आवाडे क्रीडानगरीत आयोजित केलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2024-25 बक्षीस वितरण व निरोप सभारंप प्रसंगी ते बोलत होते.
(हेही वाचा – छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर होणार कारवाई ; Udayanraje Bhosle यांची अमित शहांकडे मोठी मागणी)
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, खो-खो (Kho-Kho) या पारंपरिक खेळाला अधिक मोठ्या व्यासपीठावर नेणाऱ्या कै. भाई नेरूरकर यांचे महाराष्ट्रात खो-खो च्या विकासासाठी दिलेले योगदान अमुल्य आहे. या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या निमित्ताने कै. भाई नेरूरकर यांच्या कार्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरणही त्यानित्ताने होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात खो-खो (Kho-Kho) या खेळाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय स्पर्धेला 25 लाखाची वाढ करुन एक कोटी केली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, स्पर्धा म्हटलं की हार-जीत होत असते. परंतु जिंकण्या बरोबरच हार स्वीकारण्याचीही ताकद हवी. सगळ्या खेळाडूंच्या वर्तनामुळे खेळ आणि खेळाडू दोघांचाही गौरव वाढला पाहिजे. त्याचबरोबर आपली क्षमता पूर्णपणे पणाला लावून तुम्ही सगळ्यांनी खेळलं पाहिजे. खो-खो हा वेगाचा, चपळतेचा खेळ असून या खेळाचं दर्जेदार दर्शन आपल्याकडून या स्पर्धेच्या निमित्ताने इचलकरंजीच्या परिसरातल्या क्रीडा रसिकांना मिळालं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांनी खेळाडूवृत्ती जोपासली पाहिजे. (Ajit Pawar)
इचलकरंजीमध्ये राज्यस्तरीय खो-खो (Kho-Kho) स्पर्धा आयोजन केल्याबद्दल आयोजकाचे तसेच या स्पर्धेला संजीवनी देणारे सर्व क्रीडाप्रेमी, रसिकांचे, सगळ्या टीमचे तसेच सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, आपण सर्व मिळून खो-खो च्या माध्यमातून महाराष्ट्र आणि भारताला जागतिक स्तरावर अधिक मोठे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया. जानेवारीमध्ये भारताने जिंकलेल्या संघातील सर्वात लहान वयाची खेळाडू वैष्णवी पवार (Vaishnavi Pawar) हिचेही विशेष कौतुक त्यांनी केले.
(हेही वाचा – CBSE चा मोठा निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना देता येणार नाही बारावीची परीक्षा)
क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) म्हणाले, राज्यामध्ये क्रीडा कामगिरीत कोल्हापूर जिल्ह्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, या जिल्ह्याने आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, अनेक खेळाडू, अनेक नामवंत, म्हणजे खाशाबा जाधव पासून ते हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे, गणपतराव आंधळकर, दादू चौगुले, याच भूमीतील ऑलिंपिक जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, टेबल टेनिस खेळाडू शैलेजा साळुंखे, नेमबाज स्वप्नील कुसाळे अशा अनेक खेळाडूंनी या जिल्ह्यामध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी राज्यातील अनेक खेळाडू करत आहेत, त्यांना पाठिंबा देणे व त्यांना सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. जे खेळाडू देश पातळीवर, चांगल्या प्रकारचे खेळ करतात त्यांना नोकरीत 5 टक्के आरक्षण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाचा गौरव करणाऱ्या प्रतिभावंत खेळाडूंना शासन सेवेमध्ये थेट नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. साधारणतः 216 खेळाडूंना नियुक्ती दिलेली आहे तसेच लवकरच 32 खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात येणार आहे, असे सांगून त्यांनी आयोजकांचे व सर्व खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, या स्पर्धेसाठी 17 जिल्ह्यातील 40 संघ खो खो स्पर्धेत सहभागी झाले होते. इचलकरंजी येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी शासनाकडून 75 लाखाचा निधी मिळाला तसेच जिल्ह्यातील आमदार महोदयांनी 50 लाखाचा निधी उपलब्ध करुन दिल्याने ही स्पर्धा यशस्वी करता आली. या निधीमधून खो-खो (Kho-Kho) स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसाठी समितीने उत्तम व्यवस्था केली होती. जिल्ह्यातील आमदारांनी आमदार निधीमधून निधी उपलब्ध करुन दिल्याने सर्व खेळाडूंना अधिक चांगल्या पध्दतीने सुविधा देण्यामध्ये मदत झाली. तसेच सर्व खेळाडूंना ट्रॅक सूट पाण्याची बॉटल आणि स्मार्ट वॉच हे सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने देण्यात आल्याचे सांगून त्यांनी मदत देणाऱ्या आमदारांचे आभार मानले.
विजेते पदासाठी पुरुष गटात कोल्हापूर विरुध्द मुंबई उपनगर संघामध्ये अत्यंत चुरशीच्या सामना रंगला. पहिल्या फेरीत समान गुण झाल्याने दुसरी फेरी खेळवण्यात आली. यामध्ये कोल्हापूर संघाने मुंबई उपनगर संघावर मात करुन स्पर्धेचे विजेते पद पटकावले. कोल्हापूर संघाला 3 लाख 40 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले. मुंबई उपनगर उपविजेत्या संघाला 2 लाख 55 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तृत्तीय पुणे संघाला 1 लाख 70 हजार, 4 था विजेता सांगली संघाला 1 लाख 19 हजार, 5 वा विजेता ठाणे संघाला 85 हजार, 6 वा विजेता सोलापूर संघाला 51 हजार देण्यात आले.
महिला गटामध्ये धाराशिव जिल्हा विजेता ठरला त्यांना 3 लाख 40 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले. पुणे उपविजेत्या संघाला 2 लाख 55 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तृत्तीय ठाणे संघाला 1 लाख 70 हजार, 4 था विजेता कोल्हापूर संघाला 1 लाख 19 हजार, 5 वा विजेता सांगली संघाला 85 हजार, 6 वा विजेता नाशिक संघाला 51 हजार देण्यात आले.
(हेही वाचा – Data Leak : गोपनीय डेटा लिक करण्याची धमकी देऊन विमा कंपनीकडे ३ कोटींची मागणी)
किशोर गटामध्ये प्रथम क्रमांक विजेता कोल्हापूरचा संघ ठरला. त्यांना 1 लाख 70 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले. व्दितीय सांगली संघाला 1 लाख 36 हजार, तृत्तीय धाराशिव संघाला 1 लाख 2 हजार, 4 था विजेता सातारा संघाला 68 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले.
किशोरी गटामध्ये प्रथम क्रमांक विजेता सांगली संघ ठरला. त्यांना 1 लाख 70 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले. व्दितीय पुणे संघाला 1 लाख 36 हजार, तृत्तीय ठाणे संघाला 1 लाख 2 हजार, 4 था विजेता धाराशिव संघाला 68 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले.
खो-खो (Kho-Kho) स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये पुरुष विजेत्या ठरलेल्या कोल्हापूर संघातील खेळाडू रोहण कोरे याला अष्टपैलु खेळाडू म्हणून त्यांना 20 हजाराचा धनादेश व सौरभ आढावकर याला आक्रमक खेळाडू म्हणून 15 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले. उपविजेत्या मुंबई उपनगर संघातील खेळाडू ओंकार सोनवणे या खेळाडूला उत्कृष्ट सरंक्षक म्हणून 15 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले.
महिला गटातील धाराशिव संघातील अश्विनी शिंदे या खेळाडुला अष्टपैलु खेळाडू म्हणून 20 हजाराचा धनादेश व संध्या सुरवसे या खेळाडूला उत्कृष्ट सरंक्षक म्हणून 15 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले. पुणे संघातील प्रियंका इंगळे या खेळाडूला आक्रमक खेळाडू म्हणून 15 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले.
किशोरी गटातील सांगली संघातील अनुष्का तामखडे या खेळाडुला अष्टपैलु खेळाडू म्हणून 15 हजाराचा धनादेश व श्रावणी तामखडे या खेळाडूला उत्कृष्ट सरंक्षक म्हणून 10 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले. पुणे संघातील अर्पणा वर्धे या खेळाडूला आक्रमक खेळाडू म्हणून 10 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले. किशोर गटातील सांगली संघातील सार्थक हिरेकुंभे या खेळाडुला अष्टपैलु खेळाडू म्हणून 15 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले. कोल्हापूर संघातील रुद्र यादव या खेळाडूला उत्कृष्ट सरंक्षक व अमोल बंडगर या खेळाडूला आक्रमक खेळाडू म्हणून प्रत्येकी 10 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community