खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने शुक्रवारी, २ जून रोजी टाटा मेमोरियल सेंटरला देशात आणखी तीन ठिकाणी कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी १,२०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्व शाखेच्या माध्यमातून येत्या चार वर्षांच्या कालावधीत हा निधी कर्करोग निदान केंद्र उभारण्यासाठी दिला जाणार आहे.
या निधीतून नवी मुंबईतील खारघर, पंजाबमधील मुल्लानपूर आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे तीन कर्करोग निदान केंद्र उभारले जातील. या तीन सुविधा २०२७ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होतील आणि टाटा मेमोरियल सेंटरला त्या माध्यमातून दरवर्षी सुमारे २५,००० अधिक कर्करुग्णांवर उपचार करता येणार आहे, जे सध्याच्या त्यांच्या क्षमतेपेक्षा २५ टक्के अधिक असेल. परिणामी टाटा मेमोरियल सेंटरला वर्षाला सुमारे १.२ लाख कर्करुग्णांवर उपचार शक्य होणार आहे, अशी माहिती आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष गिरीश चंद्र चतुर्वेदी यांनी दिली.
सध्या, मुंबईतील टाटा रुग्णालयात दरवर्षी देशातील एकूण कर्करोगग्रस्तांपैकी १० टक्के रुग्णांवर उपचार केला जातो. विशेष म्हणजे टाटा कर्करोग रुग्णालयाने हाफकिन संस्थेच्या ५ एकर जागेवर १७ मजली इमारत उभारण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी टाटा रुग्णालयाचे उपसंचालक आणि कर्करोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ८०० कोटी रुपये खर्च नवीन इमारतीसाठी जवळपास ८०० कोटी रुपये खर्च येणार असून हा निधी केंद्र सरकारच्या अणू ऊर्जा विभागाकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याला केंद्र सरकारच्या विभागांची मान्यता मिळाली असून त्याचे कार्यादेशही जारी करण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community