कॉन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजेच आयसीएसई बोर्डाचा 10वी चा निकाल रविवारी जाहीर झाला आहे. 2022च्या आयसीएसई बोर्डाचा निकाल हा 99.97 टक्के इतका लागला आहे. पुण्याच्या सेंट मेरी स्कूलच्या हरगुन कौर मथारू या विद्यार्थीनीने घवघवीत यश मिळवले आहे.
हरगुन हिने 10वीच्या परीक्षेत 99.80 टक्के गुण मिळवत देशात पहिले येण्याचा मान पटकावला आहे. तर कानपूर येथील शेलिंग हाऊस स्कूलच्या अनिका गुप्ताने दुसरा आणि बलरामपूरच्या जीसस अँड मेरी स्कूलच्या पुष्कर त्रिपाठीने तिसरा क्रमांक मिळवत यश प्राप्त केले आहे.
असा आहे निकाल
2021 प्रमाणेच या वर्षीही आयसीएसई दहावीच्या निकालाने उच्चांक गाठला आहे. यावर्षी 99.97 टक्के इतका निकाल लागला असून, 2021 मध्ये 99.98 टक्के इतका निकाल लागला होता. यावर्षी ही परीक्षा देणा-या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 31 हजार 63 इतकी होती. यामध्ये मुलांपेक्षाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.98 टक्के असून मुलांचे हेच प्रमाण 99.97 टक्के इतके आहे.
कोरोनामुळे आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत पहिली तर 25 एप्रिल 2022 ते 23 मे 2022 या काळात ही परीक्षा घेण्यात आली.