माथेरान येथील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बदलापूर येथे चंदेरी गड स्थित आहे. चढण्यास अत्यंत अवघड असणारा हा गड ट्रेकर्ससाठी विशेष आव्हानात्मक असतो. या गडाचे जतन आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने अजिंक्य हायकर्स ही संघटना कायम कार्यरत असते. या संघटनेच्या सदस्यांनी अन्य शिवप्रेमींच्या मदतीने महाकठीण कार्य केले. २ हजार ८०० फूट उंच असलेल्या या गडावर ८५ किलोची पंचधातूंची छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती गडावर स्थापन करण्यात आली. या कामाचे आता सर्वांकडून कौतुक होत आहे.
याआधीही बसवलेली शिवरायांची मूर्ती
अजिंक्य हायकर्सनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा प्रथम १ मे १९८४ रोजी बसविला होता. कालांतराने तो बदलून १ मे १९९८ रोजी महाराजांची दुसरी लहान सिंहासनाधिष्टीत मूर्ती त्याच स्थळी स्थापन केली. मात्र गडावरील उन, वारा, पाऊस यामुळे तीही मूर्ती जीर्ण झाली. त्यानंतर तिसऱ्यांदा १ मे २००८ रोजी त्याच जागी मोठी चार फूट उंचीची फायबरची मूर्ती बसविली होती. परंतु गेल्या १४ वर्षात त्यावर गडावरील ऋतुमानाच्या वातावरणाचा परिणाम होत असून ती जीर्ण व्हायला लागली. हे लक्षात आल्यावर अजिंक्य हायकर्सच्या सभासदांनी विचार विनिमय करून महाराजांच्या मूर्तींची पुनःस्थापना करण्याचा निर्णय घेतला. मात्र या वेळी कायम स्वरूपी पंचधातूची मूर्ती बसवावी असे ठरविले.
(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)
किल्ल्यावर अशी चढवली मूर्ती
८५ किलोग्राम शिवरायांची मूर्ती २४ फेब्रुवारी २०२३ रोजी बदलापूर गाव छत्रपती शिवाजी मंदिर मैदान येथे एक दिवस आणि २५, २६ फेब्रुवारी दोन दिवस बदलापूर पूर्व, जिल्हा परिषद मराठी शाळा मैदान येथे दर्शनार्थ ठेवण्यात आली. त्यानंतर ही मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पंचधातूची ८५ किलोची मूर्ती आणि ४ फुट अष्टकोनी मेघडंबरी किल्ल्यावर चढवण्यासाठी जेवण, पाणी रसद आणि भलेमोठे दोनशे मीटरचे अखंड रोप, काही शंभर मीटरचे रोप, ट्रेकिंगचे यांत्रिक साहित्य अशा अवजड वस्तू तयार करण्यात आल्या. सुमारे २८०० फुट उंच चंदेरी गडावर प्रथम सर्व साहित्यासह २३०० फुटावरील गुहेपर्यंत पालखीतून मूर्ती नेली ती चिंचवली गावकऱ्यांनी मग तिथून किल्ल्याच्या सुमारे ५५० फूट उभ्या कड्यावर मूर्ती रोपच्या सहाय्याने किल्ल्यावर नेण्यात आली. हे करत असताना अवजड मूर्ती रोपला बांधलेली होती तो रोप वरचे लोक पूर्ण ताकदीनिशी खेचून घेत असताना त्यांची दमछाक होत होती. कड्यावर मूर्ती आपटू नये म्हणून अवघड जागी दोन जण जावून बसले आणि त्यांनी तिथून ते नियंत्रित केले. या शिवकार्यात अनेक दुर्गप्रेमी शिवभक्त आणि सामाजिक संस्थांनी तनमनधनाने हातभार लावला. विशेषतः चिंचवली ग्रामस्थ मंडळ आणि सह्याद्री रॉक अडवेंचर बदलापुर यांच्या टीमने मूर्ती कड्यावर खेचून घेण्यास महत्वाचे काम केले. हे काम कठीण, कष्टाचे आणि जोखमीचे होते हे विशेष. या कामागिरीवर मोलाची मदत SRA संस्थेचे आणि अजिंक्यचे संकेत राणे आणि दर्शन तसेच गणेश गीध लोणावळा यांची टीम सहाय्य करत होते. अजिंक्य हायकर्सचे अध्यक्ष दिनेश दहीवलीकर, सचिव रत्नाकर थते, कोषाध्यक्ष सुनील कदम, सदस्य सुबोध धर्माधिकारी, परेश सावंत, संजय जाधव, राजेंद्र शिंदे, राहुल खाचणे, संजय विश्वासराव, वर्षा धर्माधिकारी, मयुरी सहस्रबुद्धे, प्रणाली सुळे, तेजस्विता चौधरी, निकेत चव्हाण, अनिरुद्ध चव्हाण, विजय पार्टे, विश्वास मेस्त्री, अंकित जाधव आणि अनेक सभासदांनी या कार्यात सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांची पंचधातूची ही मूर्ती शिवजयंती दिवशी म्हणजे फाल्गुन कृष्ण त्रीतीया राज्याभिषेक शक ३४९ म्हणजे १० मार्च २०२३ रोजी चंदेरी गडावर विधीवत पुनःस्थापना करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community