लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ज्या ज्या दुकान, मॉल्ससह इतर अस्थापनांना व संस्थांना खुले करण्याची परवानगी दिली आहे, तेथे येणारे ग्राहक तथा नागरीक यांच्याकडून जर कोविड नियमांचे पालन होणार नसेल, तर त्या व्यक्तीला दंड करताना संबंधित अस्थापनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये व्यक्तीला ५०० रुपयांचा दंड तर संबंधित आस्थापनेला कोविड नियमांचे पालन करण्यात कसूर केल्याने १० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. तसेच कोविड काळाकरता संबंधित दुकान, मॉल्ससह त्या आस्थापनेला सील ठोकण्यात येणार आहे.
आफ्रिकन देशामधील विषाणूची दहशत
आफ्रिकन देशांमध्ये कोविडचा आजाराचा नवीन विषाणू आढळून आल्याने याचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यामध्ये कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडाची शिफारस केली आहे. त्यामध्ये नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक वेळी ५०० रुपयांचा दंड आकारण्याची शिफारस केली आहे. तसेच प्रत्येक मॉल्स, दुकान, शॉपिंग सेंटर आदी सार्वजनिक ठिकाणी खरेदीला येणारे ग्राहक, पाहुणे आदींवर कोविड नियमांचे पालन करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. परंतु संबंधित आस्थापनेच्या परिसरात जर एखादी व्यक्ती नियमांचे उल्लंघन करताना आढल्यास त्या व्यक्तीकडून दंड वसूल करतानाच अशा संस्था व आस्थापनांनाही दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
(हेही वाचा अलर्ट! राज्यातील ‘या’ ११ जिल्ह्यांत कोविडची चिंता वाढली!)
…तर अनिश्चित काळासाठी बंदी
जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना या त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहक किंवा लोकांना कोविड विषयक नियमांची शिस्त लावण्यात कसूर करते असे जर आढळून आले, तर कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. तसेच जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड नियमांचे उल्लंघन केले किंवा ‘एसओपी’चे पालन करण्यात कसूर केली तर त्यांना ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
खासगी वाहनात मास्क बंधनकारक
जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात तसेच कोणत्याही बसमध्ये कोविड नियमानुसार मास्क न लावल्यास त्या व्यक्तींना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच संबंधित वाहनाचे चालक, मदतनीस किंवा वाहक यांनाही ५०० रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. तसेच वाहनाचा परवाना जप्त केला जाणार आहे
Join Our WhatsApp Community