जर मुले त्यांच्या पालकांना सांभाळण्यात अयशस्वी झाली, तर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांच्या नावे केलेले मालमत्ता परत घेण्याचा अधिकार आहे, असे निरीक्षण न्यायमूर्ती एस.एम. सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती के. राजशेखर यांच्या खंडपीठाने (Madras High Court) नोंदवले आहे.
पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल आणि कल्याण कायदा, २००७ च्या कलम २३ (१) मध्ये आधीच असे नमूद केले आहे की, जर मुलगा पालकांची काळजी घेईल, अशी अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी झाला तर पालक त्यांची मालमत्ता परत घेऊ शकतात. हस्तांतरण दस्तात ही अपेक्षा स्पष्टपणे नमूद करण्याची आवश्यकता नाही, परंतु वृद्ध पालकांनी त्यांच्या मुलांच्या नावे केलेल्या सर्व भेटवस्तू दस्तांमध्ये ही एक गर्भित अट म्हणून पाहिली पाहिजे, असे न्यायालयाने (Madras High Court) म्हटले आहे.
ज्येष्ठ नागरिकांकडून, विशेषतः मुलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना मालमत्ता हस्तांतरण करण्यामागे बहुतेकदा प्रेम आणि आपुलकी असते. ज्येष्ठ नागरिकांनी मालमत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय केवळ कायदेशीर कृती नाही तर त्यांच्या वृद्धापकाळात काळजी घेतली जाण्याच्या आशेने घेतला जातो. हे प्रेम आणि आपुलकी व्यवहारात एक गर्भित अट बनते, हस्तांतरण दस्तऐवजात ही अट नमूद नसली तरी ती गृहीतच धरलेली असते. न्यायालयाने (Madras High Court) असे म्हटले की, ज्येष्ठ नागरिक कायद्याचे असे उदारमतवादी अर्थ लावणे हे ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे.
Join Our WhatsApp Community