अभिनेत्री कंगना राणावत हिने बदनामीकारक आणि धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केल्यामुळे संगीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अंधेरी न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने याची दखल घेतली. त्यासाठी न्यायालयाने कंगनाला हजर राहण्याचा आदेश दिला होता, मात्र कंगनाने विविध कारणे देत न्यायालयात हजर राहण्याचे टाळले होते. मात्र सोमवारी, २० सप्टेंबर रोजी कंगना राणावत हिला कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात हजर रहावे लागणार आहे, अन्यथा न्यायालय कंगनाच्या विरोधात अटकेचा आदेश काढू शकते.
जावेद अख्तर यांनी घेतला आक्षेप!
मागील सुनावणीच्या कंगनाने तब्येतीचे कारण देत न्यायालयात हजर राहणार नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यावर जावेद अख्तर यांनी आक्षेप घेतला होता. कंगना राणावत यांनी केलेली वक्तव्ये गंभीर आहेत, तरीही त्या गैरहजर राहत आहेत, असे ते म्हणाले. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि पुढील सुनावणीच्या वेळी हजर राहण्याचा आदेश कंगनाला आदेश देण्यात आला, अन्यथा कंगनाला अटक करण्याचा आदेश देण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले.
(हेही वाचा : कंगनाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली! आता पुढे काय?)
उच्च न्यायालयातही दिलासा नाही!
अभिनेत्री कंगना राणावत हिने तिच्याविरोधात संगीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ झाली होती. जावेद अख्तर यांनी अंधेरी न्यायालयात तक्रार केली होती. त्यावेळी न्यायालयाने यांची दाखल घेत कंगनाच्या विरोधात वॉरंट काढला होता. त्यावर कंगना राणावत हिने अंधेरी न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते यांनी ही याचिका फेटाळून लावली. यावेळी कंगना राणावत हिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी युक्तीवाद केला. त्यावेळी अंधेरी न्यायालयाने जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या तक्रारींवर कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही, अथवा साक्षीदारांची उलट तपासणी केली नाही, असे म्हटले. त्यामुळे अंधेरी न्यायालयाच्या आदेशानुसार जुहू पोलिस कलम २०२ अंतर्गत चौकशी करत आहे, हे चुकीचे आहे, असे वकील सिद्दीकी म्हणाले होते. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
सहा महिन्याच्या कारावासाची तरतूद!
कंगनाची कलम २०२ अंतर्गत चौकशी सुरु आहे. एखाद्याच्या विरोधात जाणीवपूर्वक बदनामीकारक केलेले गैरकृत्य प्रकरणी या कलमांतर्गत कारवाई होत असते, त्यासाठी ६ महिन्यांच्या कारावासाची तरतूद आहे.
Join Our WhatsApp Community