मुंबईत फेरीवाल्यांची समस्या बिकट होऊन चालली असून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून पात्र फेरीवाल्यांना ना परवाना दिला जात ना त्यांचे पुनर्वसन केले जात. मात्र, फेरीवाल्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दादर पश्चिम भागांमध्ये ही संख्या कमालीची वाढलेली आहे. पदपथासह आता रस्त्यांवरही फेरीवाल्यांनी ठाण मांडलेले आहे. परंतु अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील पदपथावर फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे जावळे मार्गावरील पदपथावर फेरीवाले बसत नसून जर दुकानदारांनी मनात आणले तरी येथील सर्व रस्त्यांच्या पदपथावर एकही फेरीवाला बसलेला पहायला मिळणार नाही, असे दिसून येत आहे.
दादर पश्चिम येथील रानडे मार्ग, सेनापती बापट मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, जावळे मार्गाच्या पदपथासह रस्त्यांवरही मोठ्याप्रमाणात फेरीवाले बसले आहेत. परंतु केशवसूत उड्डाणपूलापासून सुरू होणाऱ्या जावळे मार्गावरील सुरुवातीला तसेच पुढील भागांमध्ये पदपथावर फेरीवाले व्यवसाय करताना दिसत नसून येथील दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर व्यवसाय करण्यास मज्जाव केल्याने फेरीवाले त्याठिकाणी व्यवसाय करत नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येथील तिन्ही मार्गावरील पदपथावर दुकानदारांच्या संमतीनेच फेरीवाले बसत असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक रहिवाशांसह काही दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, दुकानदारांनी आपल्या समोरच्या पदपथावर फेरीवाल्यांना व्यावसाय करण्यास हरकत घेतल्यास ते तिथे व्यावसाय करू शकत नाही. कारण पदपथ ही जनतेला चालण्यासाठी असून त्यावर फेरीवाले बसल्यास लोकांना चालता येणार नाही. त्यामुळे दुकानदारांनी जर मनात आणले तर दादरमधील एकाही पदपथावर फेरीवाले बसू शकणार नाही. त्यामुळे फेरीवाल्यांनी कुठे व्यावसाय करावा हा त्यांचा प्रश्न असून ते रस्त्यावर बसतात किंवा कुठे बसतात हे ते ठरवतील, असे काही दुकानदारांचेही म्हणणे आहे.
(हेही वाचा – BMC : ऊर्जा, वाहने आणि कचऱ्यापासून होणारे प्रदुषण सन २०५० पर्यंत शुन्यावर येणार)
मात्र, काही फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार, काही फेरीवाले हे दुकानदारांनी बसवलेले आहेत. अनेक फेरीवाल्यांचे सामान महापालिकेच्या कारवाईदरम्यान दुकानांमध्ये नेऊन ठेवले जाते. शिवाय काही दुकानदारच आपल्या दुकानासमोरील जागेत फेरीचा व्यवसाय करतात. फेरीवाल्यांमुळेच दुकानदारांचा व्यवसाय होतो, त्यामुळे दुकानदारांचा फेरीवाले असावे असा आग्रह असतो,असेही काही फेरीवाल्यांचे म्हणणे आहे.
शिवसेना नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी दुकानदारांच्या हिताचा विचार करत रानडे मार्गावर वाहने उभी करण्याची व्यवस्था केली होती. ज्यामुळे रस्त्यावर फेरीवाले बसणार नाही. परंतु आज या रस्त्यावर वाहने उभी केली जात असून ही वाहने पदपथापासून चार ते पाच फुट लांब उभी करून फेरीवाले हे पदपथासह रस्त्यांच्या भागही व्यावसायाकरता वापरत आहेत. ज्यामुळे रस्त्यांवरील वाहने अधिक जागा व्यापत असल्याने या रस्त्यावर लोकांना चालण्यास अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community