झाडांवर बुरशी, कीड लागली असेल…तर ‘ही’ घ्या काळजी!

143

मुंबईतील विविध सोसायट्या, बंगले, विविध संस्था इत्यादींच्या मोकळ्या जागांमध्येही आपण झाडे लावली आहेत. परंतु त्या झाडांवर बुरशी, कीड किंवा अन्य एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन हीच झाडे उन्मळून अथवा तुटून पडतात. त्यामुळे खासगी जागांमधील झाडांची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका उद्यान विभागाने पाऊल उचलले आहे. जर अशाप्रकारे बुरशी कीड लागल्यास त्वरित महापालिकेच्या विभाग कार्यालयातील वृक्ष अधिकारी किंवा सहाय्यक उद्यान अधीक्षक यांच्याशी संपर्क साधा. आपल्या परिसरातील झाडांची तपासणी वेळोवेळी करून घेत, अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक ती उपाययोजना देखील वेळच्यावेळी करावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याद्वारे करण्यात आले आहे.

( हेही वाचा : बेलापूर ते मुंबई प्रवास अवघा ३० मिनिटांचा! कसा ते जाणून घ्या… )

शास्त्रशुद्ध तपासणी करणे गरजेचे

वृक्षांवर, झाडांवर बुरशी, वाळवी इत्यादींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यास झाड पडण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे जीवित वा वित्तहानी देखील होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन झाडांची नियमितपणे शास्त्रशुद्ध तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच एखाद्या झाडावर किडीचा प्रादुर्भाव असल्यास त्यापासून इतर झाडांना देखील संसर्ग होऊ शकतो. यासाठी देखील तज्ज्ञांद्वारे वेळोवेळी वृक्षांची तपासणी करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या झाडांची शास्त्रशुद्ध तपासणी नियमितपणे तज्ज्ञांद्वारे करण्यात येते. याच पद्धतीने खासगी परिसरात असणा-या झाडांची शास्त्रीय तपासणी वेळोवेळी करणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत नागरिकांनी त्यांची सोसायटी अथवा संस्था ज्या विभागाच्या हद्दीत आहे, त्या मनपा विभाग कार्यालयातील वृक्ष अधिकारी किंवा सहाय्यक उद्यान अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा व त्यांचे याबाबत मार्गदर्शन घेऊन आवश्यकतेनुसार वेळच्यावेळी उपाययोजना करावी, असेही आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.