रिक्त पदे न भरल्यास रुग्णालयांमध्ये वादविवाद अटळ : म्युनिसिपल मजदूर युनियनला भीती

130

कोविड- १९ व इतर साथीच्या आजारांच्या अनुभवावरून भविष्यामध्ये आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावर प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने आरोग्य खात्यातील सुमारे सोळा हजार पदे भरण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेने आरोग्य खात्यातील पदेही भरण्याबाबत आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आरोग्य खात्यासहीत अत्यावश्यक सेवेतील सर्व संवर्गातील रिक्त असलेली डॉक्टर्स, परिचारीका, तंत्रज्ञ, कक्ष परिचर, सफाई कामगार तसेच शवागार विभाग व सुरक्षा रक्षक इत्यादी पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. ती सर्व रिक्त पदे त्वरीत न भरल्यास रुग्णालयातील वादविवाद अटळ असल्याची भीती वजा इशाराच म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला आहे.

कामगार-कर्मचाऱ्यांची सुरक्षितता जरूरीची

म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष सुखदेव काशिद आणि सरचिटणीस ऍड. महाबळ शेट्टी यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन देत ही मागणी केली आहे. या निवेदनामध्ये त्यांनी २०२० मध्ये संपूर्ण जगाला कोविड-१९ या विषाणुच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना कोरोनाची लागण होऊन काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागलेला आहे. मुंबईतील प्रचंड व दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी रुग्ण सेवा देणारा अपुरा कर्मचारी वर्ग, तसेच तात्पुरत्या स्वरूपात अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग यांच्या मदतीने आपल्या मार्गदर्शनाखाली अतिशय परिश्रम घेऊन कोरोना नियंत्रणात येत असतानाच जलदगतीने फैलावणारा ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी काम करणारे सर्व संवर्गातील डॉक्टर्स, परिचारीका, तंत्रज्ञ, कक्ष परिचर, सफाई कामगार तसेच शवागार विभाग व सुरक्षा रक्षक इत्यादी कामगार कर्मचाऱ्यांची सुरक्षितता पहाणे अत्यंत जरूरीचे आहे. त्यांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याकरीता व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व संवर्गातील कामगार कर्मचाऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात पीपीई किट, एन ९५ मास्क, हॅण्डग्लोज, सर्जिकल कॅप, सॅनिटायझर सहीत अन्य सुरक्षिततेची साधने, त्याचप्रमाणे शासनाने कडक निर्बंध लादल्यास त्यांची जेवण-नाश्ता व रहाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

(हेही वाचा एमआयएमचे ओवैसी चांदिवलीत, जलील आझाद मैदानात?)

कोरोना १९ च्या अनुभवावरून पदे भरा

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले होते, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालये, विशेष रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये रुग्णांना सेवा देण्यात आलेली आहे. कोरोना १९ च्या अनुभवावरून आरोग्य खात्यासहीत अत्यावश्यक सेवेतील सर्व संवर्गातील रिक्त असलेली डॉक्टर्स, परिचारीका, तंत्रज्ञ, कक्ष परिचर, सफाई कामगार तसेच शवागार विभाग व सुरक्षा रक्षक इत्यादी पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. सदर पदे त्वरीत भरणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. मुंबईत वाढत असलेली लोकसंख्या व रुग्णालयात असलेल्या बेडची संख्या व महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्ण सेवा घेणाऱ्यांची संख्या, तसेच रुग्णालयांचा होत असलेला विस्तार, नव-नवीन बसविण्यात येणारी अद्ययावत उपकरणे याप्रमाणात महापालिकेच्या किंवा आरोग्य सेवा मापदंड (नॉर्मस) प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात नसल्यामुळे अनेकवेळा रुग्णांचे नातेवाईक किंवा समाजकंटक डॉक्टर्स तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांशी वादविवाद, शिवीगाळ काही प्रसंगी शारीरिक मारहाण करण्याच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महापालिका आयुक्त यांनी निर्देश द्यावेत

तरी ओमिक्रॉन संसर्गाचे संक्रमण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली रुग्णालये, विशेष रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य खात्यातील आस्थापनेवरील मुंबईतील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व संवर्गातील रिक्त असलेली डॉक्टर्स, परिचारीका, तंत्रज्ञ, कक्ष परिचर, सफाई कामगार तसेच शवागार विभाग व सुरक्षा रक्षक इत्यादी पदे अग्रहक्क क्रमाने भरून घेण्यात यावेत आणि आपली आरोग्य यंत्रणा सर्व स्तरातून सक्षम करावी. तसेच सर्व संवर्गातील कामगार कर्मचाऱ्यांना रुग्णांना चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने उच्च दर्जाची सुरक्षिततेची साधने वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याकरीता महापालिका आयुक्त यांनी निर्देश द्यावेत, असे नमुद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.