…तर मुंबईत शनिवारपासून लसीकरण पूर्णपणे ठप्प!

गुरुवारचे सुमारे ४० ते ५० हजार लसीकरण पूर्ण झाल्यानंतर, शुक्रवार ९ एप्रिल २०२१ पर्यंत पुरेल इतका लससाठा उपलब्ध असेल.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड–१९ प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी मान्यता मिळालेल्या ७१ पैकी २५ खाजगी रुग्णालयांत लससाठा संपल्याने, या २५ लसीकरण केंद्रांवर गुरुवारी लसीकरण झाले नाही. मात्र, उर्वरित केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू असून, तेथेही आता शुक्रवार ९ एप्रिलपर्यंत पुरेल इतका लससाठा शिल्लक आहे. लससाठा उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत लससाठा उपलब्ध न झाल्यास शनिवारपासून पूर्णपणे लसीकरण ठप्प होण्याची शक्यता आहे.

अशी आहे लसीकरणाची स्थिती

मुंबईत कोविड–१९ लसीकरण मोहिमेंतर्गत महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे ४९ कोविड लसीकरण केंद्रे तसेच, ७१ खाजगी रुग्णालयांत कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मुंबईत या सर्व केंद्रांवर मिळून प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. मुंबई महानगरपालिकेला ७ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण १७ लाख ०९ हजार ५५० इतक्या लसी उपलब्ध झाल्या. यापैकी, १५ लाख ६१ हजार ४२० लसी उपयोगात आल्या. म्हणजेच १ लाख ४८ हजार १३० इतका लससाठा बुधवारी ७ एप्रिल २०२१च्या लसीकरणानंतर शिल्लक होता.

(हेही वाचाः राज्यात १५ लाख लसी शिल्लक! देवेंद्र फडणवीसांचा दावा )

उद्यापर्यंत पुरेल इतकाच लस साठा

शिल्लक साठ्यातील ४४ हजार ८१० इतक्या लस दुसऱ्या मात्रेसाठी (सेकंड डोस) राज्य शासनाच्या निर्देशानुसार, राखीव ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजेच एकूण १ लाख ०३ हजार ३२० इतक्या लसी गुरुवारी सकाळी उपलब्ध होत्या. गुरुवारचे सुमारे ४० ते ५० हजार लसीकरण पूर्ण झाल्यानंतर, शुक्रवार ९ एप्रिल २०२१ पर्यंत पुरेल इतका लससाठा उपलब्ध असेल. लसीकरण मोहीम सातत्याने सुरू ठेवता यावी म्हणून लससाठा उपलब्ध व्हावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून पाठपुरावा सातत्याने सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here