देशातील कोविड-19 रुग्णांसाठीच्या उपचारार्थ लागणाऱ्या ऑक्सिजनची टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने, भारतीय तंत्रज्ञान संस्था(आयआयटी) मुंबईने निर्मितीक्षम आणि अभिनव उपाय शोधून काढला आहे. पीएसए(प्रेशर स्विंग एबसॉरप्शन) नायट्रोजन युनिटचे पीएसए ऑक्सिजन युनिटमध्ये रूपांतरण करण्याचा प्रयोग मुंबई आयआयटीने केला आहे. हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
96 टक्के शुद्ध ऑक्सिजन मिळणार
आयआयटी मुंबईने घेतलेल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये या प्रयोगाचे आशादायी परिणाम दिसून आले आहेत. यामुळे 3.5 एटीएम इतक्या दाबाने 93% ते 96% शुद्धतेच्या स्तरासह ऑक्सिजन उत्पादन साध्य करता येते. कोविड रुग्णालयांमध्ये, तसेच येऊ घातलेल्या कोविड-19 विशेष सुविधा केंद्रांमध्ये ऑक्सिजनचा अविरत पुरवठा करण्यासाठी या वायूचा उपयोग केला जाऊ शकतो.
आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी
नायट्रोजन युनिट ऑक्सिजन युनिटमध्ये कसे रूपांतरित केले जाऊ शकते? याविषयी या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे आयआयटी मुंबईचे अधिष्ठाता(संशोधन आणि विकास) प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी सांगितले की, सध्या अस्तित्वात असलेल्या नायट्रोजन संयंत्र रचनेची योग्य जुळवाजुळव आणि कार्बन ते झोलाइटमधील रेण्वीय चाळणी बदलून, हे केले गेले आहे. कच्चा माल म्हणून वातावरणातील हवा शोषून घेणारी अशी काही नायट्रोजन संयंत्रे भारतभर विविध औद्योगिक युनिटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे हे प्रत्येक औद्योगिक युनिट आपल्या नायट्रोजन संयंत्राचे ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या संयंत्रात रूपांतर करू शकेल. अशाप्रकारे सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत हा प्रयोग आपल्यासाठी उपयोगी ठरू शकतो, असेही अत्रे यांनी नमूद केले.
IIT Bombay demonstrates conversion of Nitrogen generator to Oxygen generator: A simple and fast solution for the current oxygen crisis. We request various government authorities, NGOs, and private companies to contact Prof. Milind Atrey ([email protected]). pic.twitter.com/etSdJi6ZQi
— IIT Bombay (@iitbombay) April 29, 2021
(हेही वाचाः ऑक्सिजन कॉन्संट्रेटरसाठी कॉर्पोरेट कंपन्या आणि संस्थांकडून महापालिकेला मदत!)
आयआयटीच्या प्रयोगशाळेत प्रयोग
हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स आणि पीएसए नायट्रोजन आणि ऑक्सिजन संयंत्र उत्पादक असलेले स्पॅन्टेक इंजिनियर्स, मुंबई यांचा संयुक्त प्रयत्न आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणून प्रमाणित करण्याच्या दृष्टीने, आयआयटीच्या रेफ्रिजरेशन अॅन्ड क्रायोजेनिक्स प्रयोगशाळेत पीएसए नायट्रोजन संयंत्राचे ऑक्सिजन संयंत्रात रूपांतर केले आहे. या पथदर्शी प्रयोगाचा देशभरात फायदा होऊ शकेल. देशभरातील विविध औद्योगिक युनिटमध्ये हा प्रयोग तातडीने लागू करायला, लागणारा अभ्यास करण्यासाठी, आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स आणि स्पॅन्टेक इंजिनिअर्स यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. प्रयोगासाठीची रचना तीन दिवसांत विकसित करण्यात आली आणि सुरुवातीच्या चाचण्यांनी आशादायी परिणाम दर्शवला.
Join Our WhatsApp Communityआयआयटी मुंबई आणि स्पॅन्टेक इंजिनियर्स यांच्याशी भागीदारी केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. सध्याच्या ऑक्सिजन संकटात देशाला मदत करण्याच्या दृष्टीने अस्तित्त्वात असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करुन आपत्कालीन ऑक्सिजन निर्मितीसाठी एक अभिनव उपाय शोधायला हातभार लावत आहोत. उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील अशाप्रकारच्या भागीदारीमुळे आत्म-निर्भर भारताच्या दिशेने आपली वेगाने वाटचाल होऊ शकते.
-अमित शर्मा, व्यवस्थापकीय संचालक (टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स)