महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळावर बेकायदेशीर असलेल्या भोंग्यावरून सरकारला अल्टीमेंट दिला आहे. त्याचे परिणाम मुंबईत दिसू लागले आहेत. मुंबईतील मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आवाज काही प्रमाणात बंद झाल्याचे दिसून येत आहे. कारण मुंबईत सकाळच्या वेळी मशिदीतून येणारा अजानचा आवाज ७२ टक्क्यांनी कमी झाला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
मुंबई पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांची घेतली बैठक
मुंबईत धार्मिक स्थळावर लावण्यात आलेल्या बेकायदेशीर भोंग्यांवरून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, तसेच दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये याकरता मुंबई पोलिंसानी गेल्या आठवड्यात मशिदीतील मौलाना, मौलवी, मोहल्ला कमिटी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या वरीष्ठ नेत्यांची विशेष बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पोलिसांनी शहरात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याच बरोबर दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये असे कुठलेही कृत्य कोणी करू नये, असेही या बैठकीत सांगण्यात आले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शन तत्वांच्या आधारे भोंग्यांचा आवाज नियमात असलेल्या डेसिबलमध्ये ठेवण्यात यावा, तसेच बेकायदेशीर भोंगे काढण्यात यावे व भोंगे तसेच लाऊडस्पीकर लावण्यासाठी रितसर परवानगी घेण्यात यावी, असे मुंबई पोलिसांकडून बैठकीत समजावून सांगण्यात आले होते.
पहाटेचे अजान थांबले
या बैठकीनंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की, सकाळच्या सुमारास मशिदीतून होणारे अजान भोंग्यातून करणे ७२ टक्के बंद झाले आहे. काही मुस्लिम बहुल विभागात हे अजान भोंग्यातून होत होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील नागरिकांमध्ये समंजस्यपणा अनेक धर्मियांनी सामजिक सलोखा जपत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन आणि तत्वाचे पालन करण्यास सुरुवात केली असल्याचे एका जेष्ठ पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community