मुंबईतील ‘दि ललित’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणाची प्रक्रिया राबवली जात असून, या ठिकाणी लस सुरक्षितते बाबतच्या नियमांचे पालन हॉटेल व्यवस्थापनाकडून केले जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये लसीकरण प्रक्रिया राबवणाऱ्या क्रिटी केअर रुग्णालय बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापौरांनी केली पाहणी
मुंबईच्या “दि ललित” या पंचतारांकित हॉटेलात पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांना समाज माध्यमांतून समजल्यानंतर “दि ललित” या पंचतारांकित हॉटेलमधील लसीकरण केंद्राची महापौर किशोरी पेडणेकर यांनी रविवारी आकस्मिक पाहणी केली. या पाहणी दरम्यान लस ठेवण्यासाठी असलेल्या शीतपेट्यांचे व्यवस्थित परिरक्षण होत नसल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. याबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांना महापौरांनी जाब विचारुन लस सुरक्षिततेबाबत हॉटेल प्रशासन गंभीर नसून, या ठिकाणी सर्व नियमांचे उल्लंघन करुन येथे नागरिकांना कोविड लस दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
(हेही वाचाः मुंबईतील वाहनतळ प्राधिकरणाला आता होणार सुरुवात)
रुग्णालय व हॉटेलची होणार चौकशी
या पाहणीत इतर अनेक गोष्टी समोर आल्या. ललित हॉटेलमध्ये कोल्ड चेन मेन्टेन केली जात नव्हती, घरगुती वापराच्या फ्रीजमध्ये कोविड लसींचा साठा करण्यात आला होता. आइस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात होता. त्यामुळे ‘दि ललित’मध्ये झालेल्या लसीकरणाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. महापौर पेडणेकर यांनी या प्रकाराबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांना जाब विचारला. ललित मध्ये क्रिटी केअर रुग्णालयाच्या माध्यमातून लस दिली जात आहे. मात्र, येथील लस साठवणीच्या पद्धतीबाबत साशंकता आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार असून, क्रिटी केअर रुग्णालयाचीही चौकशी केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.