महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज! कुठे वाढते तापमान, तर कुठे अवकाळी पाऊस

होळीपूर्वीच देशभरात तापमानात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. काही भागातील तापमानात लक्षणीय वाढ झाली असून काही भागांमध्ये अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. होळीनंतर सुद्धा तापमानामध्ये बदल होईल अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

( हेही वाचा : Happy Holi : कुठे रॉयल…तर कुठे फुलांची; देशभरातील होळीचे विविध रंग! )

काही भागात गारपीट होण्याची शक्यता  

देशाची राजधानी दिल्लीसह अनेक भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच पूर्व राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशमध्ये ७ ते ८ मार्चदरम्यान जोरदार पाऊस पडून गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात येत्या २ ते ३ दिवसांमध्ये कमाल तापमानात घट होईल, मात्र त्यानंतर तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीमधील हवामान सामान्य राहिल असेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘या’ भागात पावसाचा अंदाज 

दक्षिण कोकण आणि मध्य छत्तीसगडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि पूर्वी राजस्थानमध्ये प्रामुख्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही भागात ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार कल्याण डोंबिवलीत मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे स्टेशन परिसरातील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली असून या पावसामुळे कल्याणमधील रामबाग , शिवाजी चौक , चिकणघर व इतर परिसरात बत्ती गुल झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here