यंदाच्या मोसमी पावसावर ‘एल निनो’चे सावट; वातावरण बदलामुळे धोका वाढणार

162

भारतातील मोसमी वाऱ्यांना अडथळा ठरणारे एल-निनो प्रशांत महासागरात तयार होत असल्याचे संकेत शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. जवळपास ४ वर्षांनंतर असे होत आहे. या एल निनोचा भारतावर काय परिणाम होणार याविषयी आपण जाणून घेऊया, एल निनो तयार झाल्यास संपूर्ण भारतात कमी पाऊस पडतो, कित्येकदा दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागते. प्रशांत महासागरात एल-निनो विकसित होत असल्याचे जागतिक हवामान बदलावर काम करणा-या नॅशनल ओशनिक एण्ड एट्मोस्फेअरिक एडमिनिस्ट्रेशन (नोआ) या पर्यावरणप्रेमी संस्थेने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : मुंबई वडोदरा महामार्गातील तब्बल ११०० झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय; देशातील पहिलाच प्रयत्न )

पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागावर गरम पाण्याचा प्रवाह तयार झाल्यास त्याला एल निनो असे संबोधले जाते. एल निनो तयार झाल्यास जगभरातील वातावरणात बदल दिसून येतो. भारतीय मान्सूनच्या वाटचालीसाठी आवश्यक असलेले बाष्प प्रशांत महासागरातील एल-निनो खेचून घेते. परिणामी, भारतात पाऊस कमी होतो. गेल्या दहा वर्षांत २०१४ आणि २०१५ साली सलग दोन वर्ष एल-निनोमुळे भारतात दुष्काळ पडला होता. देशाची शेतीप्रधान अर्थव्यवस्थाही कोलमडून पडली होती. त्यानंतर आता २०२३ मध्ये एल-निनो विकसित होत असल्याने भारताला पुन्हा दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एल निनोमुळे एका वर्षांत सरासरीपेक्षा १० ते ३० टक्क्याने कमी पावसाची शक्यता असते. त्यामुळे पिकांचे नियोजन बिघडते. तसेच अन्नटंचाईलाही सामोरे जाण्याची भीती असते.

आयआयटी अर्थ सिस्टीमचे प्राध्यापक रघु मुर्तुगुड्डे म्हणाले की, सलग तीन वर्ष निनाची स्थिती पॅसिफिक महासागरात आढळून आली होती. या स्थितीत महासागरातील पाण्याचे तापमान वाढते. सलग तीन वर्षे निनाची स्थिती असण्याचा अर्थ होतो की, पाणी पूर्णपणे तापले आहे आणि आता एल- निनो स्थिती उद्भवणार आहे. २०१५-१६ इतकीच यावेळी एल निनोची तीव्रता असेल का? याचे संकेत आपल्याला वसंत ऋतूमध्येच मिळू शकतात.

एल-निनोचा इतिहास

सन २००० पासून २०१९ पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर दुष्काळजन्य वर्षांची चार उदाहरणे आहेत. २००२ आणि २००९ मध्ये देशव्यापी कमतरता अनुक्रमे १९% आणि २२% होती, जी सर्वात गंभीर दुष्काळी वर्षे मानली गेली. २०१५ मध्ये ही कमतरता प्रत्येकी १४% होती. यावेळीही दुष्काळ पडला होता. गेल्या २५ वर्षांत १९९७ साली एकदाच असे झाले की, देशात एल निनो असूनही सरासरीच्या तुलनेत २% अतिरिक्त पाऊस पडला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.