राज्यातील सुमारे 18 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपामुळे शासकीय रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, नगरपालिका, जिल्हा परिषदा, तहसीलदार कार्यालये, यासह अनेक सरकारी विभागांचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहे. परिचारिका, नर्सेस, वाॅर्ड बाॅयसह इतर आस्थापनातील शासकीय कर्मचा-यांनी आपापल्या कार्यालयाबाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, फोर्थ क्लासेस डाॅक्टर्स मोठ्या प्रमाणात मंगळवारपासून संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत कामावर येणार नाही, असा निर्णय या डाॅक्टरांनी घेतला आहे. नर्सेस आणि परिचारिकाही या संपात सहभागी झाल्याने सायन हाॅस्पिटलमध्ये सन्नाटा पसरलेला आहे. परिणामी, रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईतील सायनसह अनेक रुग्णालयात हेच चित्र दिसत आहे. तर पुण्यातील ससून रुग्णालयातील नर्सेसही संपात सहभागी झाल्या आहेत. ससून रुग्णालय परिसरात परिचारिकांनी आंदोलन सुरु केले आहे.
( हेही वाचा: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारचे 18 लाख कर्मचारी संपावर )
कर्मचा-यांच्या मागण्या काय?
- नवीन पेन्शन योजना रद्द करणे
- प्रदीर्घकाळ सेवेतील कंत्राटी कामगारांना समान वेतन
- सर्व रिक्त पदे तत्काळ भरणे
- कोणत्याही अटीशिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करा
- सर्व भत्ते केंद्रासमान मंजूर करा
- निवृत्तीचे वय 60 करा
- नवीन शिक्षण धोरण रद्द करा
- आरोग्य कर्मचा-यांच्या समस्यांचे तत्काळ निराकारण करा