आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ राबवा; CM Devendra Fadnavis यांची सूचना

45
आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने 'मिशन' राबवा; CM Devendra Fadnavis यांची सूचना
  • प्रतिनिधी

राज्यातील आरोग्य उपकेंद्रांपासून ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंतच्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ स्वरूपात राबवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) सांगितले की, केंद्र सरकारने राष्ट्रीय कर्करोग उपचार धोरण आणले आहे. त्याच धर्तीवर राज्यात कर्करोग निदान आणि उपचारांसाठी प्रभावी कार्यपद्धती ठरविण्यात यावी. यात केमोथेरपी, रेडिएशन थेरपी यांचा समावेश असावा आणि उपचारांसाठी विहित कालमर्यादा निश्चित करावी. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने नाविन्यपूर्ण उपायांचा अवलंब करावा. राज्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत असून, त्यांना संलग्न रुग्णालये जोडण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी लोकसंख्या आणि रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे स्वतंत्र रुग्णालये उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

(हेही वाचा – Elphinstone Flyover Bridge दोन वर्षांसाठी बंद; वाहतुकीसाठी करा ‘या’ मार्गांचा वापर)

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, “ज्या जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत, तिथे वैद्यकीय शिक्षण विभागाचे स्वतंत्र रुग्णालय आवश्यक आहे का, याची पडताळणी करावी. रुग्णालयांची गरज आणि नवीन रुग्णालय उभारणी आवश्यक असलेल्या ठिकाणांचे वर्गीकरण करून विस्तृत नियोजन आराखडा तयार करावा. धाराशिव येथे वैद्यकीय शिक्षण विभागाचे रुग्णालय उभारण्यात यावे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर ठराविक कालावधीसाठी शासकीय रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक करण्याबाबतही पडताळणी करावी.”

आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने राज्यात अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. अलिबाग आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय सामान्य रुग्णालयांचे बांधकाम सुरू आहे, तर अमरावती, वाशिम आणि धाराशिव येथील रुग्णालये निविदा स्तरावर आहेत. गुणवत्ता सुधारण्यासाठी उत्कृष्ट केंद्रांचे जाळे तयार होत असून, यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ‘हब’ आणि सात ‘स्पोक’ प्रस्तावित आहेत. तसेच, आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित केली जात आहे. सातारा, चंद्रपूर शासकीय रुग्णालये आणि सर जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपकरणांची खरेदी सुरू आहे. अवयवदान आणि प्रत्यारोपणाशी संबंधित संस्थाही उभारण्यात येणार आहेत. या बैठकीत आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि कर्करोग उपचारांसाठी ठोस पावले उचलण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या या निर्देशांमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.