बेस्टच्या ताफ्यातील अखेरची नॉन एसी डबल डेकर बसचे जतन करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने (Best Administration) घेतला आहे. मुंबईकरांच्या आठवणीतील भाग म्हणून बेस्टच्या आणिक आगारातील संग्रहालयात ही बस ठेवली जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.
बेस्ट उपक्रमाची शेवटची डबल डेकर १५ सप्टेंबरला अंधेरी स्थानक पूर्व रेल्वे स्थानक ते सीप्झ मार्गावर धावली. त्यादिवशी शेवटच्या डबल डेकरला ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्गाबरोबरच बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण निरोप दिला. मुंबईकरांच्या आठवणींतील ही बस जतन करण्याची मागणी प्रवासी संघटनाकडून होत होती. ही मागणी पाहता एका नॉन एसी डबल डेकर बसचे जतन करण्यात येणार असल्याचे उपक्रमाकडून गुरुवारी सांगितले.
(हेही वाचा – Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा उपोषण सुरु; सरकारला दिला अल्टिमेटम)
नॉन एसी डबल डेकर बस गाड्यांची सेवेतील १५ वर्षे पूर्ण झाल्याने शासन निर्णयाप्रमाणे या गाड्या सेवेतून बाहेर काढण्यात आल्या असल्या, तरी मुंबईकरांकरिता त्यांच्या आठवणीतील भाग म्हणून एक डबल डेकर नॉन एसी बस बेस्ट उपक्रमाच्या आणिक आगार येथील संग्रहालयात ठेवणार आहे. ही बसगाडी उभी करण्याकरिता शेड, प्लॅटफॉर्म आदी गोष्टींची पूर्तता करण्यात येत आहे.
डबल डेकर एसी बसची संख्या वाढणार
बेस्टची पहिली डबल डेकर बस ८ डिसेंबर १९३७ साली सुरू झाली. या बसला प्रवाशांची चांगली पसंती मिळाली होती. यापुढे एसी डबल डेकर बसच प्रवाशांसाठी चालवण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात डबल डेकर एसी बसची संख्या वाढणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये ५० एसी डबल डेकर बस दाखल होणार आहेत. जानेवारी, २०२४पासून प्रत्येक महिन्यात १०० एसी डबल डेकर बस दाखल होतील. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३५ एसी डबल डेकर बस असून, यापैकी १६ बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. लवकरच दक्षिण मुंबईत आणि मुंबईतील पश्चिम उपनगरात आणखी नवीन एसी डबल डेकर बस चालवण्यात येणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community