उन्हाळा संपायच्या आधी आणि पाऊस सुरू होण्यापूर्वी रात्री झोपताना कानाजवळ डासांची भुणभुण सुरू होते. हेच डास पुढे जाऊन मलेरिया आणि डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत ठरतात. मग मच्छर घालवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करायला सुरुवात करतो. जसे की, मॉस्कीटो कॉयल, मॉस्कीटो रिपेलंट क्रीम किंवा जेल किंवा मॉस्कीटो रिफिल बॉटल इत्यादी. पण हे सगळेच उपाय आपल्या स्वास्थ्यासाठी काही प्रमाणात हानीकारकच असतात. पण आता एक असा उपाय सापडला आहे, ज्यामुळे डासांची अंडीच नष्ट करता येतात. जर अंडीच नसली तर डासच वाढणार नाहीत आणि डासांपासून निर्माण होणाऱ्या रोगांनाही आळा बसू शकेल.
मध्य प्रदेश सरकारने डेंग्यू-मलेरियासारख्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोड पाण्याच्या साठ्यामध्ये गंबुसिया नावाचे मासे सोडले आहेत. या माशांना मोस्कीटो फिश असंही म्हटलं जातं. हे विदेशी मासे डासांची अंडी खाऊन टाकतात. पण त्याबरोबरच हे मासे खूप आक्रमक असतात. ते इतर माशांची अंडी, त्यांचे पर आणि बेडकांची अंडीसुद्धा खाऊन टाकतात. ही एक समस्या आहे.
एक संपूर्णपणे विकसित असलेला गंबुसिया मासा एकावेळी डासांची 300 अंडी खाऊ शकतो. पण निरीक्षणातून असे समोर आले आहे की, या माशांची शिकार करण्याची क्षमता वाहत्या पाण्यात, उच्च कीटकनाशके फावरलेल्या पाण्यात आणि गर्द झाडी असलेल्या ठिकाणी खूप कमी होते. गंबुसिया माशांच्या दोन प्रजाती आहेत. एक म्हणजे जी एनिफस आणि दुसरी म्हणजे जी होलब्रूकी. भारतात 1928 साली पहिल्यांदा गंबुसिया माशांना आणलं गेलं होतं. मात्र या दोन प्रजातींपैकी कोणती प्रजाती आणली गेली या विषयी निश्चितपणे सांगता येणार नाही. पण काही वर्षांनंतर असे लक्षात आले की, जी होलब्रूकी जातीच्या माशांची डासांची अंडी खाण्याची क्षमता जी एनिफस माशांपेक्षा कमी असते. गंबुसिया माशांमधली तरुण मादी आपल्या आयुष्यकाळात 900 ते 1200 पिलांना जन्म देते.
गंबुसिया मासे हे कोणत्याही वातावरणात जिवंत राहू शकतात. म्हणून तर जगातील सात खंडांपैकी सहा खंडांवर हे मासे पाहायला मिळतात. हे मासे जगातल्या 100 आक्रमक जातींपैकी एक आहेत. तरीसुद्धा कित्येक काळापासून हे मासे देशातील मलेरिया नियंत्रण करण्याच्या मोहिमेचा महत्वाचा भाग आहेत. या माशांना आंध्रप्रदेश, चंदीगड आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यात गोड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये आणि साठ्यामध्ये सोडणे सुरूच आहे.
Join Our WhatsApp Community