बेकायदा निकाह केल्याप्रकरणी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) व त्यांच्या पत्नी बुशरा बीबी (Wife Bushra Bibi) यांना अदियाला जिल्हा न्यायालयातील मेकशिफ्ट कोर्टाने शनिवारी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या दोघांच्या विवाहाविरोधोात बुशरा यांचे घटस्फोटीत पती खवर फरीद मानेका यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.
त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश कुदरातुल्लाह यांनी दोघांचा निकाह इस्लामबाह्य घोषित केला. तसेच त्यांना ५ लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला. यावेळी इम्रान खान व बुशरा बीबी हे दोघेही न्यायालयात हजर होते. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी सलग १४ तास अदियाला तुरुंगात झाली होती. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. बुशरा बीबी यांनी इद्दतचा कालावधी पूर्ण न करताच इम्रान यांच्याशी निकाह केल्याचा आरोप केला होता.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना गेल्या ५ दिवसांत तिसऱ्यांदा ही शिक्षा झाली आहे. यापूर्वी ३० जानेवारी रोजी सायफर प्रकरणात त्यांना १० वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी तोषाखाना प्रकरणातही त्यांना १४ वर्षांची शिक्षा झाली होती.
(हेही वाचा – BMC Project Cost : महापालिकेचे पायाभूत प्रकल्प दोन लाख कोटींचे, हाती मात्र केवळ ४६ हजार कोटीच )
बुशरा – इम्रान खान यांचा दोन वेळा निकाह
– बुशरा-इम्रान यांच्या निकाहाचे आयोजन करणाऱ्या मुफ्तींनी कोर्टाला सांगितले होते की, बुशरा बीबी यांच्या बहिणीने मला बुशरा यांनी इद्दतचा कालावधी पूर्ण केल्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे १ जानेवारी २०१८ला लाहोरमध्ये दोघांचा निकाह लावला होता. त्यानंतर इम्रान यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये पुन्हा माझ्याशी संपर्क साधला.
– ते म्हणाले की, पहिला निकाह शरियतनुसार नसल्यामुळे आमचा पुन्हा निकाल लावून देण्यात यावा. पहिल्या निकाहावेळी बुशराचा इद्दत कालावधी पूर्ण झाला नव्हता. ४३ वर्षीय बुशरा इमरान यांच्यापेक्षा २५ वर्षांनी लहान आहेत. त्यांना पहिल्या पतीपासून ३ मुली आणि २ मुले, अशी एकूण ५ मुले आहेत. त्यांची मुले मुसा व इब्राहिम मनेका हे २०१३ मध्ये लाहोरच्या एचिसन कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांची मोठी मुलगी मेहरू मेनका ही राजकारणी मियां अता मोहम्मद मनेका यांची सून आहे. त्यांच्या इतर दोन मुलींचीही लग्ने झाली आहेत. बुशरा बीबी यांनी यापूर्वी २०१७ मध्ये पती खावर मनेका याच्याशी घटस्फोट घेतला होता.
बुशरा व इम्रान हे दोघेही बाबा फरीद यांचे अनुयायी
– बुशरा बीबी यांचा जन्म १६ ऑगस्ट १९७४ रोजी पाकिस्तानातील पाकपट्टन शहरात झाला. त्या पंजाब, पाकिस्तानमधील राजकीयदृष्ट्या प्रभावशाली वट्टू कुटुंबातील आहेत. हे शहर १२व्या शतकातील सुफी संत बाबा फरीद यांचा दर्गा म्हणून ओळखले जाते. बुशरा व इम्रान हे दोघेही बाबा फरीद यांचे अनुयायी आहेत. त्यांची पहिली भेटही बाबा फरीद यांच्या दर्ग्यात झाली होती.
– इम्रान खान यांच्याशी निकाह करण्यापूर्वी बुशरा बीबी यांचा खवर मनेका यांच्यासोबत निकाह झाला होता. मनेका हे पाकिस्तानातील एक प्रभावशाली जमीनदार कुटुंब आहे. खावर मनेका हे एक वरिष्ठ कस्टम अधिकारी होते. ते बेनझीर भुट्टो सरकारमधील मंत्री गुलाम मोहम्मद मनेका यांचे पुत्र आहेत.
हेही पहा –