यंदाच्या गणेशोत्सवामध्ये मुंबईतील २४७ नैसर्गिक आणि कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मिळून ३७१ निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. यासर्व निर्माल्य कलशासह सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी जमा होणाऱ्या निर्माल्यांमधून दहा दिवसांमध्ये सुमारे ५०० मेट्रिक टन निर्माल्य जमा करण्यात आले असून हे निर्माल्य सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्पांमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या चरणी वाहिलेल्या पाने, फुले, दुर्वा आदी सुमारे ५०० मेट्रिक टन निर्माल्य संकलन केले आहे. महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हे निर्माल्य हलविण्यात आले आहे. मुंबईतील २४७ नैसर्गिक आणि कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मिळून ३७१ निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. तसेच ९८ वाहनांचा वापर करून हे निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठवण्यात आले. निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरूवातही झाली आहे. पुढील साधारपणे एका महिन्याच्या कालावधीत ह्या सर्व निर्माल्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल. तयार होणारे हे सेंद्रीय खत महानगरपालिका उद्यानांमध्ये खत म्हणून वापरण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी दिली आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार यंदा गणेशोत्सवात संकलित निर्माल्यापासून सेंद्रीय खत करण्याची कार्यवाही घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती देत उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव स्पष्ट केले.
मुंबईतील सुमारे दहा हजार गणेश मंडळांच्या ठिकाणी निर्माल्य एका ठिकाणी जमा करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार मंडळांनी वेगळा ठेवलेले निर्माल्य फिरत्या वाहनांद्वारे गोळा करण्यात येत होते. तसेच सर्व विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या निर्माल्य कलशांमध्ये जमा झालेल्या निर्माल्यांमधून हे एकूण ५०० मेट्रीक टन एवढे निर्माल्य गोळा करून ते सर्व खत निर्मितीच्या प्रक्रियेसाठी पाठवण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापनाने स्पष्ट केले. मागील वर्षी बाप्पांच्या चरणी वाहिलेल्या फुलांपासूनचे ५ लाख ४९ हजार ५१५ किलो निर्माल्य जमा झाले होते. यामध्ये सर्वाधिक निर्माल्याचे संकलन हे भांडुप एस विभाग, अंधेरी पश्चिमच्या के पश्चिम विभाग आणि बोरीवली आर मध्य विभागांमध्ये झाले होते.
(हेही वाचा – Kidnapping Case : लालबागच्या राजाला नवस बोलता आला नाही म्हणून दीड महिन्याच्या मुलाचे अपहरण)
जुहू समुद्र किनारी राबवली स्वच्छता मोहीम
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जुहू समुद्र किनारी शुक्रवारी २९ सप्टेंबर २०२३ ‘क्लीनथॉन २.०’ ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गणेश मूर्ती विसर्जन सोहळा संपन्न झाल्यानंतर महानगरपालिका के-पश्चिम विभागाच्या वतीने आणि ‘दिव्याज्’ व ‘भामला फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली. याठिकाणी १ हजार ३५० किलो निर्माल्य संकलन करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अमीत साटम, अमृता देवेंद्र फडणवीस, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महानगरपालिका कर्मचारी, कामगारांसह राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आदींचे दोन हजार स्वयंसेवक या मोहीमेत सहभागी झाले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community