पावसामुळे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यास भरपाई देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

185
राज्य शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.
विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, पावसाचे व इतर हवामान विषयक बाबींचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २,४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील.
गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून, अशाप्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष धोरण

  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी करण्यासाठी शेत शिवार ते बाजारपेठेपर्यंत असणारी संपूर्ण दर्जात्मक साखळी तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. किसान उत्पादक समूहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केले जाईल.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबतचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.