ऋजुता लुकतुके
देशाचा किरकोळ महागाई दर ऑगस्ट महिन्यात ६.८३ टक्क्यांवर होता. (Retail Inflation) केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई दरही सात टक्क्यांच्या खाली आल्याचं बोललं जातंय.
देशात जुलै महिन्यातील महागाई दर ७.४४ टक्के म्हणजे १५ महिन्यातील उच्चांकी स्तरावर होता. तेव्हाची परिस्थिती पाहता ऑगस्ट महिन्यातही महागाई दर सात टक्क्यांच्या वरच राहील असा अंदाज होता. पण, महागाई दर थोडा खाली आला आहे. याचा महत्त्वाचा सकारात्मक परिणाम ऑक्टोबरच्या रिझर्व्ह बँक पतधोरणावर होईल. मध्यवर्ती बँक सलग चौथ्यांदा रेपो रेट जैसे थे ठेवेल, असा अंदाज आता अर्थतज्ज व्यक्त करत आहेत. (Retail Inflation)
(हेही वाचा – Indian Football & Astrologer : मुख्य प्रशिक्षक इगॉर स्टायमॅक यांनी ज्योतिषाचा सल्ला घेण्यावर काय दिलं स्पष्टीकरण ?)
महागाई दर कशामुळे कमी झाला?
जुलै महिन्यात भाजीपाल्याच्या वाढत्या किमतीमुळेच महागाई दरही वाढला होता. पण, आता याच किमती थोड्या खाली आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात भाजीपाल्याचा महागाई दर ९.९४ टक्क्यांवर आला आहे. हाच जुलै महिन्यात ११.५१ टक्के होता. तर अन्नाच्या किमतीही गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी झाल्या आहेत.
आगामी काळ मात्र अन्नधान्याच्या किमतीच्या बाबतीत आव्हानात्मकच असणार आहे, असं तज्जांचं म्हणणं आहे. इक्रा या क्रेडिट रेटिंग कंपनीच्या मुख्य अर्थतज्ज अदिती नायर यांनीही या बाबतीत सावध केलं आहे. ‘टोमॅटोच्या अचानक वाढलेल्या किमती कमी झाल्या ही समाधानाची गोष्ट असली तरी बाकी फळभाज्या अजूनही महागच आहेत. कांद्याचे भाव वाढतायत. आणि डाळींच्या किमतीही पाऊस कमी झाला तर वाढणार आहेत. त्यामुळे महागाईचं चित्र सप्टेंबरमधील मान्सूननंतरच स्पष्ट होईल,’ असं अदिती नायर म्हणाल्या.
सरकारने अलीकडेच एलपीजी सिलिंडरच्या किमतीही कमी केल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम किमतींवर होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात मध्यवर्ती बँक तिमाही पतधोरणासाठी बैठक घेईल तेव्हा रेपो दर स्थिर ठेवले जाऊ शकतात असंही अर्थतज्जांना वाटतंय. (Retail Inflation)
हेही पहा –