मुंबईतील नालेसफाई कामाची भाजपच्यावतीने पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यादरम्यान आढळून आलेल्या कामाच्या आधारे भाजपने नालेसफाईच्या कामांकरता महापालिका अधिकाऱ्यांची टास्क फोर्स तयार करण्याची सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांची भेट घेऊन केली. त्यानंतर चहल यांनी मुंबईतील छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईची दैनंदिन तपासणी करण्याकरता उपायुक्तांच्या अखत्यारित दोन स्वतंत्र पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत सात परिमंडळ असून यामध्ये प्रत्येकी दोन म्हणजे १४ पथके आता १४ एप्रिलपासून लक्ष ठेवून राहणार आहेत.
…तर कारवाई होणार
मुंबई महापालिकेच्यावतीने नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांच्या मदतीने छोट्या व मोठ्या नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. परंतु काही महत्त्वाच्या लहान आणि मोठ्या नाल्यांच्या काही नाल्या/कल्व्हर्ट्सच्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याच्या प्रमुख समस्या आहेत, जे भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होण्यास अडथळे असू शकतात,असे आढळून आले आहे. तसेच गाळ काढण्याच्या कामात अशा प्रकारच्या अडथळ्यांच्या काही विशिष्ट तक्रारी प्राप्त होत असल्याचे सांगत आयुक्त तथा इक्बाल सिंह चहल यांनी प्रत्येक उपायुक्तांना परिपत्रक जारी करत प्रत्येक परिमंडळात त्यांच्या अखत्यारीत दोन पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ही पथके दररोज विविध भागांतील नालेसफाई कामाच्या ठिकाणी भेट देऊन त्याचा अहवाल तयार करत उपायुक्त यांना देतील. त्यांच्या निरीक्षणानुसार, पावसाळ्यात पूर येण्याची विचित्र परिस्थिती दिसून आल्यास ते त्यावर तातडीने लक्ष देतील आणि त्यासंदर्भातील कारवाईची किंवा प्रत्यक्ष पाहणी दरम्यान नालेसफाईच्या कामात चुकारपणा दिसल्यास ते त्यात हस्तक्षेप करत कारवाई करतील, असे म्हटले आहे.
( हेही वाचा उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा तलवार उंचावलेला फोटो दाखवत मनसेचा राज्य सरकारला सवाल! ‘आता यांचं काय?’ )
उपायुक्त यांनी या संबंधित अधिकाऱ्यांना ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत आणि दिलेल्या मुदतीत त्यांनी ती कामे पूर्ण न केल्यास कठोर कारवाई करावी असेही निर्देश दिले आहेत. या पथकाकडून प्राप्त झालेला अहवाल संबंधित उपायुक्त अतिरिक्त आयुक्त यांना देतील. ही पथके १४ एप्रिल २०२२ पासून तयार करण्याचे निर्देश दिले असून अतिरिक्त आयुक्त यांनीही नालेसफाईच्या तपासणीसाठी त्यांच्या संबंधित परिमंडळाला भेट देऊन विभाग स्तरावर होणाऱ्या छोट्या आणि मध्यवर्ती यंत्रणेद्वारे होणाऱ्या मोठया नाल्यांच्या कामाच्या प्रगतीचे निरीक्षण करतील, असेही निर्देश आयुक्तांनी सर्व अतिरिक्त आयुक्त यांना दिले आहेत.
Join Our WhatsApp Community