मुंबईत आजही ३९३ कोळी भगिनी पर्यावरणपूरक कंटेनरपासून वंचित

115

राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदीसह थर्माकोलच्या वापरावर बंदी आणल्याने मासळी बाजारात कोळी भगिनींकडून वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलच्या बॉक्सवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे या थर्माकोलच्या बॉक्सऐवजी पर्यावरणपूरक कंटेनरचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या मंडईतील परवानाधारक कोळी भगिनींना हे कंटेनर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील आतापर्यंत १ हजार ३८४ पात्र अर्जदार मासे विक्रेत्या महिलांपैकी ९९१ मासळी विक्रेत्यांना या कंटेनरचा लाभ मिळाला आहे.

महापालिकेचा निर्णय

महापालिका बाजारातील ३ हजार १३६ परवानाधारक मासळी विक्रेत्या महिलांना मासे साठवणुकीसाठी ५० लिटर, ६० लिटर आणि ७० लिटर अशाप्रकारे तीन पर्यावरणपूरक कंटेनरच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय नोव्हेंबर २०२१ मध्ये घेण्यात आला आणि डिसेंबर २०२१ मध्ये महापालिकेच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात या वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

(हेही वाचाः भाजपची युती बाळासाहेबांच्या शिवसेनेशी, मनसेची युती बाळासाहेबांच्या शिवसेनेशी?)

महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून राबवलेल्या योजनेमध्ये परवानाधारक मासळी विक्रेत्या महिलांपैकी पर्यावरणपूरक कंटेनरच्या पुरवठ्यासाठी एकूण १ हजार ६१८ कोळी महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १ हजार ३८४ कोळी महिलांचे अर्ज हे कंटेनरसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे या पात्र कोळी महिलांना कंटेनरचा पुरवठा करण्यासाठी पुढील कार्यवाही महापालिकेच्यावतीने करण्यात आली.

कार्ड स्वाईप न झाल्याने घोळ

महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, लेखा विभागाच्यावतीने कंटेनर उपलब्ध करून देण्यासाठी अधिदानाकरता स्वाईप कार्ड मिळवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत १ हजार १९१ प्रिपेड कार्ड प्राप्त झाले होते. पण स्टेट बँक इंडियाचा सर्व्हर डाऊन असल्याने १ हजार १९१ कार्डपैकी फक्त ९९१ कार्ड स्वाईप झाले असून, २०० कार्ड स्वाईप झाले नसल्याने स्वाईप कार्ड घेतलेल्या पात्र कोळी भगिनींना याचा लाभ मिळू शकला नाही.

इतका आहे खर्च

या सर्व कंटेनरच्या खरेदीसाठी ४ कोटी ८० लाख ९४ हजार ७७५ एवढ्या अर्थसहाय्याची गरज असून उर्वरित ३९३ कोळी महिलांसाठी ५३ लाख २७ हजार ११५ रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या उर्वरित निधीच्या तरतुदीसाठी मंजुरी प्राप्त झाल्यानंतर ३९३ पात्र कोळी महिलांना कंटेनर उपलब्ध करून दिले जातील, असे नियोजन विभागाचे म्हणणे आहे.

एकूण पात्र कोळी महिलांची संख्या : १३८४

एकूण स्वाईप कार्ड प्राप्त अर्जदार : ११९१

शिल्लक लाभार्थी अर्जदार : १९३

प्राप्त प्रिपेड कार्डपैकी स्वाईप झालेले: ९९१

प्राप्त प्रिपेड कार्डपैंकी स्वाईप न झालेले : २००

एकूण शिल्लक लाभार्थी : ३९३

कंटेनरची किंमत : १३ हजार ५५५ रुपये

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.