मुंबईतील भटक्या कुत्र्यांपाठोपाठ भटक्या मांजराचीही नसबंदी करण्याचा निर्णय मागील तीन वर्षांपूर्वी घेण्यात आल्यानंतर आतापर्यंत ५४७० मांजरांची नसबंदी करण्यात आली आहे. मात्र, पहिल्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नेमण्यात आलेल्या संस्थांचा कालावधी संपुष्टात आल्याने आता पुढील तीन वर्षांसाठी संस्थांची नेमणूक करण्यात येत आहे. त्यामुळे नव्याने संस्थांची निवड करण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मागील वर्षी जिथे एक हजार रुपये नसबंदीसाठी मोजले जाणार होते, तिथे आता दोन हजार रुपये मोजले जाणार आहेत.
प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत श्वान नियंत्रण विभागाच्यावतीने १९९४ पासून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते. त्यानंतर १९९८ पासून न्यायालयाच्या निर्देशानुसार अशासकीय संस्थांच्या मदतीने हा कार्यक्रम पुढे राबवण्यात येत आहे. मुंबईत बहुसंख्य प्राणीप्रेमींच्या घरांमध्ये कुत्रा, मांजर आणि अन्य प्राणी पाळले जातात. मुंबईत कुत्र्यांच्या संबंधात नियंत्रण ठेवण्याची तरतूद असली तरी मांजरांबाबत तशी तरतूद नव्हती. विशेषत: झोपडपट्टी चाळींमध्ये मांजरांची संख्या अधिक आढळते. काही वेळा मांजराने नख मारल्याने किंवा चावल्याने गंभीर इजा होण्याच्या दुर्घटना घडत असतात. मुंबई महापालिका रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते, त्याच धर्तीवर महापालिकेने भटक्या मांजरांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय सन २०१९ मध्ये घेण्यात आला होता.
प्रत्येक वर्षी सरासरी ०८ हजार ते ११ हजार मांजरांची नसबंदी करण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये नर मांजराच्या नसबंदीसाठी १६०० ते २००० रुपये आणि मादी मांजरासाठी १८०० ते २२०० रुपयांचा दर संस्थांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन वर्षांपूर्वी नर मांजराच्या नसबंदीसाठी ६०० ते ८०० रुपये आणि मादी मांजराच्या नसबंदीसाठी ८०० ते १००० रुपये एवढा दर देण्यात आला होता. त्यामुळे प्रति वर्षी २ कोटी १३ लाख ५६ हजार ४०० रुपये एवढा खर्च करण्यात येणार आहे. यामुळे तीन वर्षांसाठी ६ कोटी ४० लाख ६९ हजार एवढे खर्च अपेक्षित आहे.
(हेही वाचा – अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी; सन्मान निधी योजनेअंतर्गत आता ८ हजार देणार?)
Join Our WhatsApp Community