मुंबईकरांनो! ‘या’ भागात होणार पाणी कपात

100

शुक्रवारी, 12 नोव्हेंबर रोजी पवई येथे वैतरणा आणि उर्ध्व वैतरणा यामधील 900 मिली मीटर व्यासाच्या छेद  जल जोडणीवर अकस्मात गळती उद्भवल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाली आहे. जी दक्षिण, जी उत्तर, डी व ए या विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. उद्या सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच  नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.

पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन

पवई येथे वैतरणा (२४०० मिली मीटर) आणि उर्ध्व वैतरणा (२७५० मिली मीटर) यामधील ९०० मिली मीटर व्यासाच्या छेद जलजोडणीवर अकस्मात गळती उद्भवली. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे सदर गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आलेले आहे. सदर दुरुस्तीच्या कामामुळे मलबार हिल, वरळी आणि पाली येथील जलाशयाद्वारे व माहिम येथून होणा-या थेट पाणीपुरवठ्यावर दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुस-या दिवशी म्हणजेच दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ या दरम्यान परिणाम होणार आहे. तरी या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात येत आहे.

(हेही वाचा : कार्तिकी वारी : एसटीचा संप रेल्वेचा मात्र दिलासा )

वरील तपशिलानुसार दिनांक १२ व १३ नोव्हेंबर २०२१ रोजी ज्या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे, त्या परिसरांची विभागनिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे.

१. जी दक्षिण विभागः वरळी कोळीवाडा, पोचखानवाला मार्ग, वरळी बीडीडी चाळ, प्रभादेवी, डिलाईल मार्ग, आदर्श नगर, जनता कॉलनी, वरळी हिल मार्ग

२. जी उत्तर विभागः माहिम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी

३. डी विभागः लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपिअन्सी रोड), भुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, रीज मार्ग, महालक्ष्मी मंदीर विभाग, एल. डी. रुपारेल मार्ग

४. ए विभागः कुलाबा, न्यू फोर्ट, बॅक बे, मिलेट्री ऍन्ड नेव्ही विभाग, साबू सिद्दीकी

गळती दुरुस्तीच्या कामामुळे उपरोक्त परिसरांमध्ये दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजीसुद्धा कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तरी संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि सदर कामाच्या कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे नम्र आवाहन महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.