‘या’ कारणांमुळे मुंबईत लसीकरणाचा सावळागोंधळ! 

मुंबईतील लसीकरण केंद्रातील सावळागोंधळ दूर करायचा असेल, तर पुरेशा प्रमाण आणि नियमितपणे साठा उपलब्ध करून द्यायला हवा, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

126

देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून महाराष्ट्रात मुंबई आघाडीवर आहे. परंतु लसींचा पुरवठा करताना मुंबईला सध्या फारच कमी लस दिल्या जात आहेत. त्यातच जो लससाठा दिला जात आहे, तोही नियमितपणे दिला जात नाही. परिणामी मुंबईत कमी लससाठा आणि अनियमितता यामुळे लसीकरणाचा सावळागोंधळ सुरू आहे. राज्य सरकारच्या नियोजनाच्या अभावामुळेच मुंबईत ही परिस्थिती निर्माण झाल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेचे नाव बदनाम होते!

मुंबईतील लसीकरण केंद्रांमध्ये लससाठा अभावी केंद्र बंद राहणे किंवा उशिराने सुरु करणे, असे प्रकार सुरु आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लस साठा कमी असल्याने त्यासाठी अधिक वेळ जात आहे. परिणामी दैनंदिन लसीकरणाची प्रक्रिया राबवणे हे जिकरीचे काम बनलेले आहे. त्यामुळे सरकारने मुंबई महापालिकेला एक निश्चित कोटा दिल्यास त्याप्रमाणे नियोजन करणे सोपे जाईल. परंतु एक तर निश्चित कोटा दिला जात नाही आणि तोही वेळेवरही दिला जात नाही. एक दिवस दिला, तर पुढील चार दिवस दिला जात नाही. त्यामुळे दैनंदिन लसीकरण मोहीम राबवताना पुरेशाप्रमाणात लस नसल्याने काही केंद्रे बंद करणे, तसेच काही केंद्रे लस साठा कमी असल्याने ते लवकर बंद करावे लागतात. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाला तारेवरील कसरत करत काम करावे लागते. हे जरी सत्य असले तरी चांगल्याप्रकारे मोहीम राबवत असतानाही केंद्र बंद असणे किंवा लवकर बंद करावे लागत असल्याने महापालिकेचे नाव बदनाम होत आहे, असाही सूर त्यांनी आळवला.

(हेही वाचा : अधिकाऱ्यांवरचा अतीविश्वास मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणार का?)

लस पुरवठा अपुरा होतोय!

राज्य सरकारकडून लस देताना, रात्री केव्हाही फोन करून आपली गाडी पाठवा, असे सांगितले जाते. साहजिकच लस मिळेल म्हणून आम्ही आमचे वाहन पाठवतो. पण तिथे पोहोचल्यानंतर केवळ ७० ते ८० हजार लससाठाच उपलब्ध होतो. जर दिवसाला ४५ ते ५० हजारांचे लसीकरण करायचे असेल, तर हा फक्त दीड दिवसांचाच साठा असतो. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा लस मिळेल, याची शास्वती नाही. मग दोन ते चार दिवसांनी लस साठा दिला जातो. अशाप्रकारे जर लस मिळणार असेल तर मुंबईत लसीकरण राबवायचे कसे, असा सवालच त्यांनी केला आहे. कधी रात्री, तर कधी पहाटे फोन करून लससाठा दिला जातो. पहाटे जेव्हा साठा मिळतो तेव्हा त्याच दिवशी लस दिल्या जाव्यात, असाही आग्रह धरला जातो. त्यामुळे मग कधी कधी दुपारी १२ वाजता केंद्रात लसीकरण सुरु केले जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला जो साठा दिला जातो, त्यातून सरकार मग मुंबईला साठा उपलब्ध करून देते. पण सरकारनेही योग्यप्रकारे नियोजन करून एका ठराविक दिवशीच जर आपल्याकडे साठा करून त्यातील साठा उपलब्ध करून दिल्यास आणि तेही नियमितपणे, तर मुंबईत लसीकरण केंद्रांमधील गोंधळ कधीही निर्माण होणार नाही. मुंबईतील लसीकरण केंद्रातील सावळागोंधळ दूर करायचा असेल, तर पुरेशा प्रमाण आणि नियमितपणे साठा उपलब्ध करून द्यायला हवे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.