पंढरपूरमधील वैकुंठ स्मशानभुमीत हल्ली माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट वारंवार घडतांना आढळून येत आहे. मयताच्या अंत्यविधीनंतर त्याच्या अंगावरील सोन्यासाठी संपूर्ण राखच चोरुन नेणारी एक अज्ञात टोळी सक्रीय असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पंढरपूर येथील कोळ्याचा मारुती या विभागातील प्रभावती रामचंद्र कोरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. समस्त कोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन मुले, मुलगी, पती व सर्व नातवंड आणि नातेवाईकांनी जड अंतःकरणानी त्यांना निरोप दिला. त्या पंचतत्वात विलिन झाल्या. परंतु अंत्यसंस्कार झालेल्या सदर व्यक्तिची राख (अस्थी) कोणीतरी अज्ञात व्यक्तिने भरुन नेली असल्याचे निदर्शनास आले आहे. माणूसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे, लोकांमधील वाढत चाललेली असंवेदनशीलता व्यक्त करणारे हे निषेधात्मक कृत्य आहे.
(हेही वाचा – महापालिका मुख्यालय इमारतीच्या डागडुजीवर सुमारे दहा कोटींचा खर्च : तरीही इमारतीला लागली गळती)
हिंदू धर्मात जन्म व मृत्यू याचे महत्वाचे संस्कार सांगितले आहेत. अंत्यसंस्कार झालेल्या मयताच्या चीतेचा अग्नि शांत होण्याआधीच जर पाणी ओतून ती राख भरुन त्यातील सोन्याच्या लालसेपोटी असं दुष्कृत्य कोणी करत असेल तर निश्चितच ही निंदनीय घटना आहे. आता त्या व्यक्तिच्या तिसऱ्या दिवशी नातेवाईकांनी अस्थी कोठून आणायच्या? कशाचे पूजन करावयाचे? हा गंभीर प्रश्न आज त्या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.
स्मशानभूमित मृत व्यक्तिवर अग्नि संस्कार करण्यासाठी काही लोक तेथेच राहत आहेत. ते सर्व लाकडाचा पुरवठा ही करतात. मग या व्यक्तिस काहीच कसे माहित नसते? या अस्थिचोरांना मयत झाल्याचे कोण सांगते का? की अस्थिचोरांची व येथील लोकांची साखळी आहे ? त्यांची साखळी असेल तर मग अशा लोकास प्रशासन जाणिवपूर्वक पाठीशी घालत आहे का? असे एक नाहीतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
पंढरपूर नगरपालिका प्रशासनास पंढरपुरातील नागरिकांकडून विनंती करण्यात येते की सदरचा हा अघोरी प्रकार थांबविण्यासाठी पंढरीतील मृत व्यक्तिची मृत्यू नंतरची विटंबना थांबविण्यासाठी स्मशानभूमित एक कायमचा दिवसपाळीसाठी व दुसरा रात्रपाळी करणारा कर्मचारी नेमावा व तेथील सर्वच गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे ही बसवावेत.तरच कोठेतरी अशा प्रकरास आळा बसेल. या मृत आत्म्यास शांती लाभेल. सदरच्या घटनेने पंढरपुरातील नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नगरपालिका प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात व राख चोरणाऱ्या टोळीवर कारवाई करावी. अन्यथा पुन्हा भविष्यकाळात अशा घटना घडल्या तर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात आंदोलन करू! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. यावेळी कोळी समाजाचे नेते सुनील कोरे व मयताचे नातेवाईक व समाजबांधव उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community