दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) धुळमुक्त करण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार करून त्यानुसार माती टाकून हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु हि हिरवळ टिकून राहण्यासाठी महापालिकेच्यावतीने या मैदानाच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करून तीन वर्षांकरता तीन कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली होती. परंतु या देखभाल करणाऱ्या कंत्राटदारालाच कार्यादेश न देता हे कंत्राट रद्द करण्याचा प्रयत्न झाला. परिणामी या मैदानाची योग्यप्रकारे देखभाल न झाल्याने यावरील हिरवळ सुकून माती उडू लागली आहे. त्यामुळे केवळ राजकारणामुळे शिवाजी पार्कची माती झाली असून धुळीचे लोळ उडून शिवाजी पार्कमधील जनता हैराण झाल्याचे पहायला मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानाचा कायापालट करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आमदार निधी मंजूर करून दिला होता, तसेच यावर हिरवळ राखून मैदानाचा परिसर धुळमुक्त करण्यासाठी युवा सेना अध्यक्ष व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मैदानाच्या विकासाचे काम हाती घेतले. महापालिका जी/उत्तर विभागाच्या माध्यमातून मैदानाच्या भागात गवताळ परिसर निर्माण करण्यासाठी विहिरी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून रिचार्ज करत हे मैदान धुळमुक्त करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी मैदानातील रेनवॉटरसह पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आल्या. त्यामुळे गवताळ भाग तयार करण्यात आला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे नव्याने होणारी हिरवळ व माती टिकून राहावी, संपूर्ण परिसराचे स्वच्छता योग्य प्रकारे व्हावी, नव्याने दुरुस्त करून बसवण्यात आलेली तुषार सिंचन प्रणाली सतत कार्यान्वीत राहावे व नागरिकांच्या इतर कोणत्याही प्रकारच्या मैदाना संबंधीच्या समस्या तात्काळ सोडवता याव्यात याकरिता छत्रपती शिवाजी महाराज पार्क चे परिरक्षण व साफसफाई करण्यासाठी चे तीन वर्षाचे कंत्राट कामासाठी निविदा मागवून पात्र कंपनीची निवड करण्यात आली. यासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च अंदाजित होता आणि यासाठी कपूर ट्रेडिंग ही कंपनी पात्र ठरली. या कंपनीने तीन वर्षांकरता सुमारे अडीच कोटी रुपयांमध्ये कंत्राट मिळवले होते.
(हेही वाचा शीव हिंदु स्मशानभूमी चार महिने राहणार बंद, पण विद्युत आणि पीएनजीवरील दाहिनी राहणार सुरु)
परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्ता स्थापन होताच जी उत्तर विभागाचे तत्कालिन सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे जी उत्तर विभागात नव्याने आलेल्या सहायक आयुक्तांवर दादर परिसरातील राजकीय पक्षांच्या नेत्यांसह शिवाजी पार्कमधील रहिवाशांचा वाढता दबाव लक्षात घेता त्यांनी हे कंत्राट रद्द करून महापालिकेच्या माध्यमातून याची देखभाल करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या कामगारांमार्फत या मैदानातील बोअर वेलच्या पाण्याद्वारे नियमित पाणी शिंपडणे अशाप्रकारची कामे करण्याचे निर्देश सहायक आयुक्तांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु महापालिकेच्या कामगारांकडून हे नियमित पाणी शिंपडले जात नसल्याने यावरील गवत सुकून गेले आणि यावरील लाल मातीची उडून जावी लागली आहे. त्यामुळे या उडणाऱ्या लाल मातीमुळे स्थानिक रहिवाशी हैराण झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने नेमलेल्या कंत्राट कंपनीमार्फत देखभाल केली असती तर हिरवळ कायम राहून लाल माती उडू शकली नसते तसेच महापालिकेच्या कामगारांमार्फत याची देखभाल झाली असती तरीही उडणाऱ्या लाल मातीची समस्या निर्माण झाली नसती. त्यामुळे राजकारणामुळे शिवाजी पार्कमध्ये धुळीचे लोट उडून लागल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या धुळीच्या त्रासामुळे या मैदानातील लाल माती काढून टाकण्यात यावी अशी मागणी स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी केली असून रहिवाशांनीही ही मागणी लावून धरली आहे.
Join Our WhatsApp Community