बालविवाहसारख्या कुप्रथेवर फार पूर्वीच बंदी घालण्यात आली होती, पण तरीही अद्याप या कुप्रथेला आळा बसलेला नाही. राज्यात विविध भागांत गेल्या 19 महिन्यांत कोरोना काळात 1 हजार 99 बालविवाह रोखण्यात आले. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2021 या दरम्यान, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाने ही कारवाई केली आहे. महिला आणि बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 121 बालविवाह रोखण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोंदिया जिल्ह्यांत एकही बालविवाह रोखण्यात आल्याची नोंद नाही.
तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती
राज्यात मुलीचे लग्न वय 18 वरुन 21 वर्षे करण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरु आहे. मात्र, त्याबाबतचा अंतिम आदेश अद्याप आलेला नाही. त्यामुळे राज्यात अजूनही मोठ्या संख्येने बालविवाह होत आहेत. राज्यात गेल्या वर्षात 581 बालविवाह रोखले गेले आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार, मुलाचे वय 21, तर मुलीचे वय 18 पेक्षा कमी असल्यास, ते कायदेशीर विवाहास पात्र नसतात. विवाहावेळी वर किंवा वधू, जरी अल्पवयीन असले तरी तो बालविवाह ठरतो. राज्यात 581 बालविवाह रोखण्यात जरी यश मिळाले असले, तरी छुप्या पद्धतीने बालविवाह झाल्याची आकडेवारी यापेक्षा जास्त असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
(हेही वाचा: राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत आरोग्य मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले… )
कोरोना काळात अधिक वाढ
कोरोना काळत रोजगार नाही, शाळा बंद आहेत त्यामुळे मुलीचे लवकरात लवकर लग्न लावून जबाबदारीतून मुक्त होण्याकडे पालकांचा कल असतो. रोजगारासाठी एका गावातून दुस-या गावात स्थलांतर करणा-या कुटुंबांना मुलींना घरी ठेवणे किंवा बरोबर घेऊन जाणे दोन्ही धोक्याचे वाटते. त्यामुळे त्यांच्यात मुलगी वयात आल्यावर किंवा लवकरच लग्न लावून दिले जाते.
Join Our WhatsApp Community