मागील पाच वर्षांत तब्बल ६०८ किलोमीटरचे रस्ते झाले सिमेंट काँक्रिटचे!

186
मागील पाच वर्षांत तब्बल ६०८ किलोमीटरचे रस्ते झाले सिमेंट काँक्रिटचे!
मागील पाच वर्षांत तब्बल ६०८ किलोमीटरचे रस्ते झाले सिमेंट काँक्रिटचे!

रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी खड्डे मुक्त रस्ते असावेत यासाठी, मुंबई महानगरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत आहे. मागील पाच वर्षांत ६०८ किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत मुंबईतील सुमारे १ हजार ५६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आणखी ४०० किमीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण प्रगतीपथावर आहे.

महानगरपालिकेच्या रस्ते विभागामार्फत अनेक ठिकाणी रस्त्यांचे पृष्टीकरण करण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एकूण सात परिमंडळातील खराब रस्त्यांच्या पृष्ठीकरणासाठी १२५ कोटी रूपयांची तरतूद महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्ड्यांची समस्या निश्चितच कमी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे. गरजेनुसार आणखी सहा परिमंडळांसाठी ६ निविदा मागविण्यात आल्या असून या निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर आहे.

(हेही वाचा – Maharashtra Government : अर्थसंकल्पातील घोषणा हवेत विरली; महात्मा फुले जन आरोग्य योजनेची उपचारमर्यादा ५ लाख झालीच नाही)

यंदाच्या वर्षापासून देखभाल दुरूस्तीसाठी पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग हे दोन्ही रस्ते २९ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले. या दोन्ही रस्त्यांसह पूर्व उन्नत मार्ग तसेच सर्व प्रमुख रस्त्यांची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी महानगरपालिकेने स्विकारलेली आहे. दोन्ही द्रुतगती महामार्गांच्या देखभाल दुरूस्तीसाठी महानगरपालिकेने निविदा मागवून समर्पित यंत्रणेला हे काम देण्यात आले आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून खराब आढळलेल्या भागांचे पृष्ठीकरण करून खड्डे भरण्यात आले आहेत. दोन्ही द्रुतगती महामार्गांवर सततच्या पावसातही वाहतूक सुरळीत सुरू आहे तसेच कुठेही खड्डा आढळला तरीही तातडीने भरला जात आहे.

यंदाच्या वर्षी पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी रिएक्टिव्ह अस्फाल्ट आणि रॅपिड हार्डनिंग या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामध्ये पावसातही रिएक्टिव्ह अस्फाल्टचा वापर करून खड्डे भरणे शक्य होत आहे. तसेच कोरड्या रस्त्यावर रॅपिड हार्डनिंगचा वापर होत आहे. नागरिकांची विशेषतः वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्ते विभागाची संपूर्ण टीम रस्त्यांच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी ऑनफिल्ड सतत तैनात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.