कोविड सेंटर चौकशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतली सर्व सहायक आयुक्त, डिन, वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक

259
कोविड सेंटर चौकशीच्या पार्श्वभूमीवर वर प्रशासनाने घेतली सर्व सहायक आयुक्त, डिन, वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक

कोविड सेंटरप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)च्या माध्यमातून सुरु असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या खरेदी प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्व रुग्णालय आणि कोविड सेंटरचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधिकारी, मध्यवर्ती खरेदी खाते आणि २४ विभागांचे सहायक आयुक्त यांची महापालिका प्रशासनाच्या वतीने एक बैठक घेत त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांना योग्यप्रकारे सहकार्य करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी खरेदी केलेल्या प्रत्येक साहित्यांच्या कार्यादेशासह झालेल्या खर्चाचा अहवाल आपल्या स्वाक्षरीसह सादर करण्याच्या सूचना करत एकप्रकारे सर्व अधिकाऱ्यांना जमा खर्चाचा लेखाजोखाच देण्याचे कळवले असल्याचे समजते आहे.

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारासू यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत उपायुक्त (लेखापाल) रामदास आव्हाड, सहआयुक्त मध्यवर्ती खरेदी खाते विजय बालमवार, उपायुक्त रमाकांत बिरादर, २४ विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त, महापालिका रुग्णालय आणि कोविड सेंटरचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधिकारी तसेच कोविडच्या काळात साहित्य खरेदीच्या प्रक्रियेत असलेले सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. गुरुवारी (२९ जून) दुपारी सुट्टीच्या दिवशी महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या तब्बल दीड तास चाललेल्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी सर्वांना कोणाकडून काय काय वस्तूंची खरेदी केली आहे आणि त्यावर किती खर्च झाला आहे, त्यांचे अधिदान किती झाले आहे याच्या लेखी माहितीचा संच आपल्या स्वाक्षरीने तयार करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना दिल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – Eknath Shinde : पारंपरिकतेसोबत शेतीमध्ये अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करा, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन)

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरी छापा मारुन त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. जयस्वाल यांच्या घरावरील छाप्यानंतर महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल २८ ते ३० जणांची तातडीने बैठक बोलावली असल्याचे बोलले जात आहे. या सर्वांना कोविड काळातील खर्चाचा लेखाजोखा स्वाक्षरीसह सादर करायला लावून एकप्रकारे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)हे स्वत: भोवती कवच कुंडल तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या खरेदी प्रक्रियेत आयुक्त व अतिरिक्त आयुक्त हे एकटे नसून यामध्ये मोठ्याप्रमाणात इतरांचीही तेवढी भूमिका आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत एकप्रकारे एवढ्या मोठ्याप्रमाणात अधिकाऱ्यांचा सहभाग दाखवून या कारवाईपासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.