सनातन म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशी व्यवस्था आहे. त्यामुळे सनातन संस्कृतीच्या विरोधात बोलणाऱ्यांचे समूळ उच्चाटन करू. आम्ही सनातनी आहोत, कायर नाही. आमचा इतिहास वीरांच्या बलिदानाने प्रेरित झाला आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत, म्हणजे कधीच संयम सोडणार नाही, असे गृहीत धरू नका. आम्ही कधी कुणाला छेडणार नाही, पण तुम्ही छेडले तर सोडणार नाही. आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पहाल, तर याद राखा… डोळे फोडूच, पण हातही तोडून टाकू, असा इशारा भाजपाच्या भोपाळमधील खासदार खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी रविवारी दिला. ( Sadhvi Pragya Singh Thakur)
वसई येथे रविवारी ८ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘सनातन राष्ट्रचेतना’ सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उत्तम कुमार नायर, श्रीराज नायर, अभिजित राणे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी विरोधकांवर चांगलाच हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, सनातन संस्कृतीला विरोध करणारे अज्ञानी आहेत. त्यांनी सर्वात आधी सनातनचा अभ्यास करावा, त्यांचे सारे विचार बदलतील, असे त्यांनी सांगितले.
भारताची मूळ संस्कृती ही सनातन संस्कृती असून, इंग्रजांनी भारताचे ‘इंडिया’ केले. एक प्रकारे भारताला बदनाम करण्याचे हे षडयंत्र त्यामागे होते, ते पुढेही सुरूच राहिले. पण, भारत हा आता विश्वगुरु बनला आहे आणि यापुढेही तो जगाचा मार्गदर्शक म्हणून योगदान देत राहील. आपण आपल्या भारत भूमीला आईच्या स्थानी मानतो. त्यामुळे सनातनवर जे टीका टिप्पणी करीत आहेत, ते आपल्याच आईला नकळतपणे शिवी देत आहेत. अशा लोकांकडून समाजाला कोणताच चांगला लाभ मिळणार नाही. त्यामुळे सनातन जर त्यांना समजला, तर ते धन्य होतील, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या
तुम्ही इटलीवाल्या बाईचे नाव का बदलले?
- स्वातंत्र्यानंतर जेवढी वर्षे काँग्रेसने राज्य केले, तेवढी वर्षे हिंदूंवर अन्याय होत राहिला. पण, जेव्हा सत्ता परिवर्तन झाले तेव्हापासून हिंदूंचा आवाज बुलंद झाला आहे. त्यामुळे आता समझोता नाही, आता जशास तसे उत्तर देणार. इंग्रजांच्या गुलामीची निशाणी असलेले ‘इंडिया’ नाव बदलायचा विचार सुरू असताना काँग्रेसवाले म्हणतात नावात काय आहे? मग तुम्हाला इटलीवाल्या बाईचे नाव का बदलावे लागले?
- काही लोकांचा मानसिक विकास उशिराने होतो, असे म्हणतात. काँग्रेसचे युवराज ५० वर्षांचे झाले तरी त्यांचा मनोविकास होत नाही. या व्यक्तीने नुकतेच भारत भ्रमण केले, तेव्हा त्याच्या बुद्धीचा थोडासा विकास झाला. हा व्यक्ती आधीपासून भारतात फिरला असता, तर आधीच बालबुद्धी विकसित झाली असती. अशा या अविकसित माणसाला देशाचे सर्वोच्च पद देण्यासाठी काही शक्ती एकत्र येत आहेत. पण, हा हिंदू आता एकसंध झाला आहे, त्यांना त्यांच्या कू-प्रयत्नांत यशस्वी होऊ देणार नाही, असेही साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या.
(हेही वाचा : Anna Hazare : अण्णा हजारेंविषयी सोशल मिडियावर बदनामीकारक मजकूर लिहिणे आव्हाडांना भोवले)
आम्ही अखंड विश्वावर राज्य करू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे काश्मीरमधील कलम ३७० हटले. आता पाकव्याप्त काश्मीर दूर नाही. त्यानंतर लाहोर, बांगलादेश, अफगाणिस्तान, चीन, तिबेट दूर नाही. कारण हे संपूर्ण विश्व भारतभूमीचा भाग आहे. आम्ही अखंड विश्वावर राज्य करण्याचे आपले स्वप्न आहे. त्यामुळे भारताला विश्वगुरुच्या स्थानावर आरूढ करण्यासाठी हिंदूंनी एकजूट व्हा, असे आवाहन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले.
काँग्रेसचा मूळ आधार हा तोडा आणि राज्य करा!
- लव्ह जिहाद हा कानाडोळा करण्यासारखा विषय नाही. त्याची पाळेमुळे खोलवर पसरली आहेत. लँड जिहाद, धर्मांतरण हे सुद्धा आव्हानात्मक प्रश्न भारतासमोर उभे ठाकले आहेत. सर्व ताकदीनिशी त्यांचा सामना करण्याची गरज आहे.
- काँग्रेसचा मूळ आधार हा तोडा आणि राज्य करा, असा असून समाजाला खंडित करण्याची त्यांची परंपरा आहे. तर, राष्ट्रवाद, राष्ट्रहित, अखंडता हा भाजपाचा विचार आहे.
- मुलींनी स्वतंत्र विचार अवश्य बाळगावेत; मात्र आई वडिलांचा सन्मान राखून, हिंदू धर्मातच विवाह करावा. अन्यथा तुकडे तुकडे केलेले तुमचे शरीर कुठे सापडेल, हे सांगता येत नाही.
- त्यामुळे आपल्या मातृशक्तीला संस्कारित करा. जेणेकरून आपली येणारी पिढी सुरक्षित आणि संस्कारित राहील. अन्यथा येणारा काळ आपल्यासाठी घातक ठरेल. मी इतिहास सांगतेय, तुम्हाला वर्तमान बदलायचा आहे. हा समाज जागृत झाला, तर कोणाचीही हिंमत होणार नाही आपल्या माता भगिनींना छेडायची, असेही साध्वी म्हणाल्या.