राज्यातील शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याबाबत चार महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते. त्यानंतर अतिशय कमी कालावधीत महानगरपालिकेच्या शाळेत मध्यवर्ती कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर नाका कामगारांनाही कौशल्य शिक्षण-प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामुळे कामगारांचे कौशल्य वाढून त्यांच्या रोजगारातही वाढ होणार आहे, विश्वास महाराष्ट्राचे कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्याचा शालेय शिक्षण विभाग, कौशल्य विकास सोसायटी व मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून महानगरपालिकेच्या १९६ माध्यमिक शाळा मिळून २९४ कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचा पथदर्शी प्रकल्प अर्थात पायलट प्रोजेक्ट ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकरशेट शाळेत उभारण्यात आला आहे. या मध्यवर्ती कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण मंत्री लोढा यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते, परंतु प्रत्यक्षात या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे अखेर या खात्याचे मुख्यमंत्री व स्थानिक आमदार असलेल्या लोढा यांच्याच हस्ते याचे लोकार्पण पार पडले.
राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, कौशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशीष कुमार सिंग, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन, महानगरपालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह व्यावसायिक तसेच कौशल्यपूर्ण शिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कौशल्य विकास शिक्षण देण्यात येणार आहे. समवेत, राज्यात पाच हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ५०० गावांत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे आश्वासक उद्गार लोढा यांनी काढले. पुढे ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काळाची गरज ओळखून कौशल्य शिक्षणावर भर दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तब्ब्ल ४५८ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (आयटीआय), १२७ अभियांत्रिकी महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर केंद्रांच्या माध्यमातून येत्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला कौशल्य विकास शिक्षण देण्यात येणार असल्याचेही लोढा यांनी जाहीर केले. कौशल्य विकास केंद्र उभारणीला वेग दिल्याबद्दल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कामकाजाचेही त्यांनी कौतुक केले.
(हेही वाचा – Shivsena Eknath shinde : शिवसेना उबाठा व्यतिरिक्त इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेशाकडे कल)
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून शालेय शिक्षणाला वेगळी जोड देण्यात येणार आहे. येत्या काळात प्रत्येक विद्यार्थी हा शाळा महाविद्यालयातून शिक्षणासह कौशल्य अवगत करूनच बाहेर पडणार आहे. ज्या मुलांकडे तंत्रशिक्षण असेल त्यांना ही संधी आपोआप मिळणार आहे. मुलांनी जर विद्यार्थीदशेपासूनच कौशल्य शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत केले, तर त्यांचा विकासही वेगाने होणार यात शंका नाही, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री व शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक करताना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, आज जागतिक कौशल्य विकास दिवस आहे. या महत्त्वाच्या दिवशी आपण ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबईतील २५० माध्यमिक शाळांमधील ४२ हजार विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास शिक्षण देण्यात येणार आहे. आजच्या या लोकार्पण सोहळ्यातून आपल्याला हा टप्पा गाठण्यासाठी उर्जा मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.
अपर मुख्य सचिव आशीष कुमार सिंग यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शाळांमध्ये असलेल्या रिकाम्या वर्ग खोल्यांमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू करावीत. तसेच इयत्ता चौथीपासून विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे द्यायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सहआयुक्त अजित कुंभार यांनी आभार मानताना कौशल्यावर आधारित शिक्षण काळाची गरज असल्याचे नमूद केले. सर्व मान्यवरांनी कौशल्य विकास केंद्राचे मुख्य नियंत्रण कक्ष आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. मध्यवर्ती कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community